– ठिकाण बदलले : परिस्थिती नाही
– प्रवाशांची प्रचंड हेळसांड
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
वणी आगार प्रमुख व आमदारांच्या आदेशाने वणी-मारेगाव-यवतमाळ राज्य महामार्गावरुन आवागमन करणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या बस चालक व वाहकांनी मारेगावात बस थांब्याच्या नियोजित जागीच बस थांबवावी अशा सूचना करण्यात आल्या होत्या.परिणामी मारेगावात बस थांब्याची जागा बदलली.परिस्थिती मात्र जैसे थे आहे.यात प्रवाशांची प्रचंड हेळसांड होत असून जनसामान्यातून आता या निर्णयाबाबत रोष व्यक्त होऊ लागला आहे.
गेल्या तीन दशकापासून मारेगावात बस स्थानकाचा प्रश्न प्रलंबित आहे.लोकशस्त्रने याबाबत आमदारांशी संवाद साधला असता २६ जानेवारी २०२४ पर्यंत बस स्थानकाच्या भूमिपूजनाच्या तयारीचा ‘मानस’ आमदारांनी दर्शविला होता.तूर्तास ‘बी अँड सी क्वार्टर’ येथे प्रवाशांकरिता तात्पुरते शेड उभारून स्वच्छतागृहाची व्यवस्था करण्यात येईल अशी ग्वाही आमदारांनी दिली होती.८ दिवस उलुनही याबाबत अद्याप कुठलीही ‘ॲक्शन’ मात्र घेण्यात आलेली नाही.

परिणामी मारेगावात प्रवाशांची धावपळ दिसून येत आहे.काही प्रवाशांना याबाबत कल्पना नसल्याने प्रवासी या ठिकाणाहून त्या ठिकाणी भटकताना दिसून येत आहे.तर बस थांब्याच्या नियोजित जागी ‘बी अँड सी क्वार्टर’ येथे सर्वत्र चिखलाचे साम्राज्य असल्याने प्रवाशांना पावसाच्या सरी झेलत ताटकळत रस्त्यावरच उभे राहावे लागत आहे.
तुर्तास वणी आगार प्रमुख व आमदार साहेबांच्या सूचनांचे पालन राज्य परिवहन महामंडळाचे वाहक व चालक ‘आपका हुकुम सर आंखो पर’ म्हणून करत असले तरी या ‘नियोजन शुन्य सुचनेने’ जनसामान्यांची मात्र यात प्रचंड हेळसांड होत असल्याचे विदारक वास्तव दृष्टिक्षेपात आहे.




