– बळीराजासह जनसामान्य सुखावले
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
यंदा प्रचंड उन्हाच्या तडक्यात मृग नक्षत्र कोरडे गेले.मान्सूनने चकवा दिला.परिणामी खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या होत्या.शेतकऱ्यांसह नागरिकांना पावसाची प्रतीक्षा लागली होती.अखेर दिर्घप्रतीक्षा संपत आज ता.२६ जुन रोजी शहरात पावसाला सुरुवात झाल्याने उकाड्यापासून दिलासा मिळाला.परिणामी बळीराजासह जनसामान्यही सुखावले.
खरिपाच्या पेरणी करिता ‘संजीवनी’ असलेला मान्सून यावर्षी बराच लांबला.परिणामी बळीराजा पुरता हवालदिल झाला. अंगाची काहीली माजवणाऱ्या उन्हाच्या तडाक्यात मृग नक्षत्र कोरडे गेले.खरिपाच्या पेरण्या लांबल्या.
आर्द्रा नक्षत्राच्या सुरुवातीपासून वातावरणात कमालीचा बदल झाला.अंगाला झोंबणाऱ्या उन्हाने काहीशे नमते घेत निळ्याभोर आकाशात काळे ढग दिसायला लागले.येथूनच आज ना उद्या पाऊस येणार असल्याची वर्दी लागली होती.
अखेर आज दुपारी बळीराजासह जनसामान्यांना लागलेली पावसाची प्रतीक्षा संपत शहरात पावसाला सुरुवात झाली.यावेळी वातावरणात गारठा पसरल्याने दीर्घ काळापासून सुरू असलेल्या ‘कुलर्स’ ना काहीशी विश्रांती मिळाल्याचे चित्र सर्वत्र दिसून आले.
पावसाच्या आगमनाने खरिपाच्या पेरण्यांना वेग येणार असून नवजोमाने शेती कामांची लगबग सुरू होणार आहे.




