– जीवन काळे यांची उपसभापती पदी वर्णी
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
मारेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती पदाची निवड प्रक्रिया २३ मे रोजी दुपारी येथील कृ.उ.बा.स.सभागृहात पार पडली.यात जनहित कल्याण संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गौरीशंकर खुराणा यांची सभापती तर शिवसेनेचे जीवन काळे यांची उपसभापती पदी वर्णी लागली.
मारेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया ३० एप्रिल रोजी पार पडली होती. यात काँग्रेस प्रणित शेतकरी एकता पॅनल ने अठरा पैकी तब्बल १७ जागांवर आपले वर्चस्व प्रस्थापित करीत वज्रमुठ कायम ठेवली होती.
कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर सभापती व उपसभापती कोण होणार याकडे जनसामान्यांचे डोळे लागले असता दोन्ही निवडीबाबत चांगलाच खेळ रंगला होता.निवडीवरून अनेक चर्चांना उधाण आले होते.
दरम्यान आज चर्चांना पूर्णविराम मिळत जनहित कल्याण संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गौरीशंकर यांची सर्वानुमते कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती पदी तर शिवसेनेचे जीवन काळे यांची उपसभापती पदी निवड करण्यात आली. सभापती उपसभापती निवडीची प्रक्रिया आर.व्ही. निनावे यांनी पार पाडली.
सभापती व उपसभापतींची निवड झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात एकच जल्लोष केल्याचे चित्र पहावयास मिळाले.




