– शिवनाळा येथील कुटुंब उघड्यावर
– घोगुलदरा येथील बंडा जमीनदोस्त
– घोडदरा येथील गोठा क्षतिग्रस्त
– खैरगाव भेदी येथील १३ घरे जमीनदोस्त
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
तालुक्यात अवकाळीचा कहर अविरत सुरू असल्याने शेतकरी पुरता मेटाकुटीला आला आहे.दरम्यान ता.२६ व २७ एप्रिल रोजी रात्री तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस कोसळला.यात अनेकांचे संसार उघड्यावर पडले.
– तालुक्यातील घोगुलदरा येथील शेतकरी मारोती तुरणकर यांचे शेतातील बंडा ता.२७ एप्रिल रोजीच्या वादळी वाऱ्याने जमीनदोस्त झाला.बंड्यात ठेवलेले काही शेती उपयोगी साहित्य तसेच पशुखाद्यासह खताच्या बॅगा ओल्या झाल्याने शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याची माहिती आहे.
– तालुक्यातील शिवनाळा (उमरी फोड) येथील सुशीला भुतु जुनघरे यांचे घर २६ एप्रिल रोजीच्या वादळी वाऱ्यात उध्वस्त होऊन कुटुंब उघड्यावर पडले.अत्यंत हलाखीची परिस्थिती असलेल्या सुशीला जुनघरे यांचे आर्थिक मदती करिता शासनाकडे डोळे लागले आहे.
माणुसकीचे दर्शन…
सुशीला जुनघरे यांचे घर वादळी वाऱ्यात उध्वस्त झाले असता येथील तलाठी जयवंत कनाके यांनी घर उभारणीसाठी मदत म्हणून एक हजार रुपयांची मदत करुन माणुसकीचे दर्शन दिले.
– तालुक्यातील घोडदरा येथील शेतकरी सदाशिव मिलमिले यांचे शेतातील गोठा वादळी वाऱ्याने उद्ध्वस्त झाला असून त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
– तालुक्यातील खैरगाव भेदी येथील १३ घरे २६ एप्रिल रोजीच्या वादळी वाऱ्यात उध्वस्त झाली असुन अनेक कुटुंबे उघड्यावर पडली आहे.





