— उपचाराअभावी वेदना सहन करणाऱ्या ग्रामीण रुग्णांसाठी तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा एकाच छताखाली
— डोळे, हाडे, मधुमेह, हृदयरोग, स्त्रीरोग आदी विविध आजारांवर मोफत तपासणी व मार्गदर्शन
मारेगाव / मोरेश्वर ठाकरे……
ग्रामीण भागातील अनेक कुटुंबे आजही आर्थिक अडचणी, अपुऱ्या वैद्यकीय सुविधा आणि शहरांपर्यंत पोहोचण्याच्या गैरसोयीमुळे आजार अंगावर काढतात. वेळेवर उपचार न मिळाल्याने किरकोळ व्याधीही गंभीर स्वरूप धारण करतात. अशा परिस्थितीत गरजू रुग्णांना दिलासा देणारा मानवतेचा हात पुढे करत साई पॉलिटेक्निकच्या वर्धापनदिनानिमित्त आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय, सावंगी (मेघे) यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन माजी जिल्हा परिषद सदस्या प्रितीताई संजय काकडे तथा स्व.अहिल्याबाई बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संजय काकडे यांनी केले आहे.
सोमवार, ता. १० ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत साई पॉलिटेक्निक, किन्ही (जवादे) येथे हे शिबिर होणार असून, ग्रामीण नागरिकांना नामवंत तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी, उपचार व मार्गदर्शन मिळणार आहे.

या शिबिरात नेत्ररोग, अस्थिरोग, मेडिसिन आणि स्त्रीरोग तज्ज्ञांची सेवा उपलब्ध राहणार आहे. मोतीबिंदू तपासणी, डोळ्यांची तपासणी, हाडांचे विकार, मधुमेह, रक्तदाब, हृदयरोग, दमा, पचनाचे विकार, महिलांचे आरोग्य, गर्भधारणा तपासणी, वंध्यत्व तपासणी यासह विविध आजारांवर सल्ला दिला जाणार आहे. तसेच गरजू रुग्णांसाठी मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार असून, चष्म्यांचे मोफत वितरणही केले जाणार आहे.
याशिवाय बीपी, शुगर, बीएमआय तपासणी, आरोग्य समुपदेशन, औषधोपचार, फिजिओथेरपी मार्गदर्शन तसेच शासकीय आरोग्य योजनांची माहितीही नागरिकांना दिली जाणार आहे.
ग्रामीण जनतेच्या आरोग्याच्या वेदना समजून घेत, “आरोग्य हीच खरी संपत्ती” या भावनेतून उभारलेले हे शिबिर अनेक गरजूंसाठी आशेचा किरण ठरणार आहे. आर्थिक विवंचनेत अडकलेल्या कुटुंबांना तज्ज्ञ वैद्यकीय सेवा त्यांच्या गावाजवळ उपलब्ध करून देणारा हा उपक्रम आरोग्यसेवेतील सामाजिक बांधिलकीचे प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे.




