— अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आंदोलनाचा इशारा
— स. पो. नि. वाहतूक उपशाखा वणी यांना मनसेचे निवेदन
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
वणी यवतमाळ मार्गावर सुसाट धावणाऱ्या खाजगी ट्रॅव्हल्स टप्पा वाहतुकीवरील बंदी धुडकावून प्रवाशांची अवैध वाहतूक करीत असुन यामुळे अनेकदा अपघात होतात. त्यामुळे वणी – यवतमाळ अवैध प्रवासी वाहतूक ट्रॅव्हल्स कायम स्वरूपी बंद करा, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना तीव्र स्वरुपाचे आंदोलन करणार, अशा आशयाचे निवेदन मनसे नेते राजु उंबरकर यांच्या नेतृत्वात, वाहतूक उपशाखा वणी यांना देण्यात आलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे
वणी यवतमाळ मार्गावर अनेक अवैध प्रवाशी वाहतूक करणाऱ्या ट्रॅव्हल्स दररोज सुसाट धावत असुन या ट्रॅव्हल्स वर अर्ध शिक्षित आणि अप्रशिक्षित चालक असतात. जास्त प्रवासी मिळविण्याच्या नादात या ट्रॅव्हल्समुळे अनेकदा मोठमोठे अपघात घडतात. तथा वाहनातून क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची ने-आण केल्या जाते. हा प्रकार वाहतूक प्रशासन उघड्या डोळ्याने पाहत असल्याचे वास्तव असुन, ट्रॅव्हल्स चालकाकडून मिळणाऱ्या आर्थिक चिरीमिरीतून दुर्लक्ष करित असल्याचा निवेदनातून ठपका ठेवण्यात आला आहे.
दरम्यान वणी शहरात या सर्व ट्रॅव्हल्सचा थांबा हा एस. टी. महामंडळाच्या बसस्थानकासमोर असुन ह्या गाड्या या ठिकाणी उभ्या राहून प्रवासी भरत असतात. त्यामुळे याठिकाणी वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होतो. शासकीय नियमानुसार वणी वरून प्रवासी घेऊन निघालेली ट्रॅव्हल्स थेट यवतमाळलाच जाऊन थांबली पाहिजे. परंतु रस्त्यातील सर्व थांब्यावर ह्या गाड्या थांबून प्रवासी घेत असतात.
सदर ट्रॅव्हसला परिवहन विभागाकडून एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणा पर्यंत प्रवाशांना आणण्या नेण्याचा परवाना असतो.परंतु नियमांची पायमल्ली करत हे ट्रॅव्हसधारक प्रवाशी भरून टप्पा वाहतूक करीत आहे. या बाबीकडे उप प्रादेशिक परिवहन विभागासह वणी वाहतूक शाखा डोळेझाक करीत आहे. या ट्रॅव्हल्सचा परवाना हा वरात – सहल इत्यादी कामासाठी असताना हे ट्रॅव्हसधारक अवैध प्रवासी वाहतूक करीत आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसात या सर्व अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या ट्रॅव्हल्स बंद करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या विरोधात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार असल्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेते राजु उंबरकर यांनी निवेदनातून दिला आहे.




