— पर प्रांतामधुन येतात भाविक
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
वनोजादेवी येथे “जानामाय-कासामाय ” देवीचे पुरात मंदीर असुन नऊ दिवस चालणाऱ्या दुर्गोत्सवात तालुक्यासह जिल्हा व पर प्रांतामधुन नवसाला पावणारी देवी म्हणून श्रध्देने दर्शनासाठी भाविकांची या नवरात्री पर्वावर मंदिरात गर्दी पहावयास मिळते.
तालुक्यातील वनोजादेवी हे गाव वडकी – खैरी- मार्डी व पुढे वणी ला जोडणाऱ्या या मार्गावर असुन अगदी मार्गालगत पुरातन जानामाय-कासामायचे चिरेबंदी दगडाने बांधलेले मोहक कलाशिल्पांचा बेमिसाल नमुणा असलेले हेमाडपंथी मंदीर आहे. सर्वच स्तरातील लोकांच्या नवसाला पावणारी देवी म्हणून या देवीची ओळख आहे.

बहुतांश धार्मिक स्थळे एकल नावाने ओळखले जाते.परंतू या मंदिराची ओळख मात्र दोन बहिणीच्या नावाने आहे. मंदिराच्या आख्यायीके नुसार जानामाय-कासामाय या दोन सख्या बहिनी असून एक दिवस या दोन बहिनी शेतात काम करणाऱ्या वडिलांची शिदोरी घेवून शेतात गेल्या.वडीला सोबत शिदोरी खाऊन घरी परतत असताना अचानक त्याच शेतात त्या दोघीही बहिनी लुप्त झाल्या. आणि धरणी मातेच्या पोटातून त्या ठिकाणी दोन मुर्ती वर आल्या. मुर्तीच्या गायमुखातून थंड-गरम पाण्याचे झरे वाहू लागले.ही गोष्ट सर्वत्र कळताच या ठिकाणी मंदीर व थंड-गरम पाण्यासाठी जलकुंड बाधल्या गेले.अशी आख्यायिका सांगितली जाते.
या मंदिरात नवरात्र, चैत्र मास,आधिक मासच्या काळात विविध धार्मिक कार्यक्रम चालतात.तर बोललेला नवस पुर्ण करण्यासाठी वर्षभर भाविक येत असतात. नवरात्री पर्वावर होणाऱ्या गर्दीमुळे मंदीर व परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त होते. घटस्थापना पासुन तर दसरा पर्यंत या मंदिरात विविध कार्यक्रम होतात. नवसाला पावणारी देवी म्हणून या नवरात्री पर्वावर जिल्ह्यासह प्रांतामधुन भाविकांची गर्दी पहावयास मिळते.




