– संशयिताची यवतमाळ कारागृहात रवानगी
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
तालुक्यातील एका गावातील एका विवाहितेच्या घरी कुणी नसताना एका वासनांध नराधमांने विवाहीतेचा हात पकडून विनयभंग केल्याची संतापजनक घटना १४ जुलै रोजी दुपारी ३:३० वाजेदरम्यान घडली.याप्रकरणी पिडीत विवाहितेने मारेगाव पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली असता पोलिसांनी संशयित आरोपीस ताब्यात घेतले असून त्याची रवानगी यवतमाळ कारागृहात करण्यात आली आहे.
पीडित विवाहितेने मारेगाव पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीनुसार ता.१४ जुलै रोजी दुपारी ३:३० वाजेदरम्यान पिडीतेच्या घरी कुणी नसताना वासनांध नराधमाने पिडित विवाहितेचा हात पकडून तिला बळजबरीने घरात ओढण्याचा प्रयत्न केला.यावेळी घाबरलेल्या पिडीतेने शेजारील घरात धाव घेतली.शेजारील घरात झोपून असलेल्या वृद्धेस पीडितेने उठविण्याचा प्रयत्न केला. वासनांध नराधमाने तिथेही प्रवेश केला.
घडलेल्या प्रकाराने पुरती घाबरलेली पिडीता स्वतःचा बचाव करत कशीबशी स्वगृही परतली असता वासनांध नराधम पिडीतेच्या घरासमोरील असलेल्या एका घराच्या वऱ्हांड्यात येऊन झोपला.
सायंकाळी ७ वाजे दरम्यान पीडीतेचे सासरे शेतातून घरी आले असता पिडीतेने घडलेला सर्व प्रकार आपल्या सासऱ्यांना सांगितला.पीडित विवाहितेचे पती काही कामानिमित्त घुगुस येथे गेले असल्याने पीडितेने हा सर्व प्रकार आपल्या पतीस फोनवर सांगितला.
अखेर १५ जुलै रोजी पीडितेने मारेगाव पोलीस स्टेशन गाठत रीतसर तक्रार दाखल केली. मारेगाव पोलिसांनी १५ जुलै रोजी रात्री उशिरा संशयित आरोपी विनोद गुलाब बावणे (३७) यास ताब्यात घेत भांदवी ३५४,३५४ अ नुसार गुन्हा दाखल केला.संशयित आरोपीची रवानगी यवतमाळ कारागृहात करण्यात आली आहे.
घटनेचा तपास मारेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार जनार्दन खंडेराव यांचे मार्गदर्शनात बीट अंमलदार राजू टेकाम करीत आहे.
