— हलाखीच्या परिस्थितीतून यशोशिखर गाठलेल्या तरुणाईचा सन्मान
— प्रा. यशराज शिंदे (सांगली) यांचे तरुणाईला मार्गदर्शन
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव.
मारेगाव / मोरेश्वर ठाकरे
विविध क्षेत्रांत आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर हलाखीच्या परिस्थितीवर मात करत यशोशिखर गाठलेल्या युवक-युवतींचा गुणगौरव व सन्मान करण्यासाठी मारेगावात आज सायंकाळी ६ वाजता नगरपंचायत प्रांगणात “गुण गौरव सोहळा” उत्साहात पार पडणार आहे. मारेगाव तालुका गुणगौरव सोहळा समिती व जनहित कल्याण संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हा सोहळा संघर्षातून उभ्या राहिलेल्या यशकथांचा गौरव करणारा ठरणार असुन या गुणगौरव सोहळ्यास सांगली येथील प्रा. यशराज शिंदे यांचे मौलिक मार्गदर्शन लाभणार आहे. या सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजन समिती कडुन आवाहन करण्यात आले आहे.

या सोहळ्याचे उद्घाटन खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या हस्ते होणार असून, अध्यक्षस्थानी माजी आमदार वामन कासावार राहणार आहेत. कठीण परिस्थितीतही जिद्द, चिकाटी आणि परिश्रमाच्या बळावर यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा यावेळी गौरव करण्यात येणार आहे. आजच्या स्पर्धात्मक युगात अडचणींशी दोन हात करत पुढे जाणाऱ्या तरुणांसाठी हा सन्मान आत्मविश्वासाची नवी ऊर्जा देणारा ठरणार असून, हा सोहळा केवळ पुरस्कार वितरण न राहता प्रेरणेचा दीप प्रज्वलित करणारा ठरणार आहे.
विशेष: प्रा. यशराज शिंदे (सांगली) यांचे मार्गदर्शन लाभणार असून, त्यांच्या विचारांतून तरुणाईला नव्या उंची गाठण्याची प्रेरणा मिळणार आहे.




