●८२ सुवर्ण ९ रजत कांस्य पदक तथा सन २०२३ ची नॅशनल स्केटिंग चॅम्पियन
●स्वप्नल फाउंडेशन पुणे चा पुढाकार
लोकसूत्र न्युज नेटवर्क: मारेगाव
पुणे येथे १५ मार्च रोजी स्वप्नल फाउंडेशन पुणे च्या पुढाकारातून घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यात बोटोणी येथील व सध्या कोंढवा बुद्रुक पुणे येथे वास्तव्यास असलेली हिंदरत्न कु. मनस्वी विशाल पीपरे या ६ वर्षीय चिमुरडीस आदर्श बाल गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. यापूर्वी हिंदरत्न कु. मनस्वीला ८२ सुवर्ण ९ रजत ९ कांस्य तथा सन २०२३ ची नॅशनल स्केटिंग चॅम्पियनशिप मिळाली असल्याने मारेगाव तालुक्याचे नाव ह्या चिमुरडीमुळे संपुर्ण विश्वात प्रसिद्धीच्या झोतात येत आहे.
दरम्यान स्वप्नल फाउंडेशन पुणे या स्वयंम सेवी संघटनेकडुन महाराष्ट्र राज्यातील कला, क्रीडा, सामाजिक तसेच सांस्कृतिक क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्तीना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. त्याचाच एक भाग म्हणून, स्वप्नल फाउंडेशन अध्यक्षा शोभाताई बल्लाळ, निवृत्त जिल्हा न्यायाधीश पुणे रवींद्र कुलकर्णी, तसेच माईंड पॉवर ट्रेनर डाॅ. दत्ता कोहिनकर यांच्या हस्ते हिंदरत्न मनस्वीला बाल गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.
हिंदरत्न कु. मनस्वी हीचे मुळगाव यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव तालुक्यातील बोटोणी असुन घरची परिस्थिती बेताचीच. मात्र मनस्वीला अगदी तीन चार वर्षांतच स्केटिंगची आवड निर्माण झाली. त्यामुळे आई वडिलांनी तीच्या भविष्यासाठी पुणे गाठत मिळेल ते काम करुन मनस्वीची आवड जोपासली. आता मनस्वीला सहा वर्ष पुर्ण झाले असुन कठोर परिश्रमातून अगदी सहाव्या वर्षापर्यंत ८२ सुवर्ण ९ रजत ९ कांस्य पदक, याशिवाय २०२३ ची नॅशनल स्केटिंग चॅम्पियनशिप मिळाली आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसह अनेक जागतिक विक्रम मनस्वीने केले आहे. या अष्टपैलू कामगिरी करिता अनेक स्तरावरून १४ पुरस्कार मिळाले आहे. मनस्वी रॉक ऑन व्हील ॲकॅडमि कात्रज पुणे येथे प्रशिक्षक विजय मलजी यांच्या मार्गदर्शनात स्केटिंग चे धडे घेत आहे.
मनस्वीच्या यशामागे प्रशिक्षक व आई वडिलांची मोलाची साथ आहे. मनस्वीचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. मनस्वीच्या या उत्तुंग भरारीमुळे मारेगाव तालुक्याचे नाव विश्वात प्रसिद्धीच्या वाटेवर असुन मारेगाव तालुक्याची मान अभिमानाने उंचावत आहे.





