– मारेगाव शहरातील प्रभाग क्र.११ येथील घटना
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
मारेगाव शहरातील प्र.क्र. ११ येथील रस्त्याच्या कडेला असलेल्या नालीत पडून घोड्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना २ ऑगस्ट रोजी सकाळी घडली. घोडा पडला त्या ठिकाणी नालीवर चेंबर नसल्याने एका मूक जनावराचा बळी गेल्याने नगरपंचायतचा हलगर्जीपणा चव्हाट्यावर आला असून येथील नागरिकांत प्रशासनाविरुद्ध कमालीचा रोष व्यक्त होत आहे.
प्रशासन स्तरावरून योग्य नियोजना अभावी शहरास विविध समस्यांनी विळखा घातला आहे.यात रस्त्यावरील मोकाट जनावरांचे झुंड,शहरातील प्रचंड वाढलेली भटक्या कुत्र्यांची संख्या, आठवडी बाजारात सर्वत्र पसरलेला चिखल अशी नानाविध उदाहरणे सांगता येतील.सर्व गोष्टी वेळोवेळी निदर्शनास आणूनही प्रशासन याबाबत जागरूक दिसून येत नाही.
दरम्यान २ ऑगस्ट रोजी येथील प्रभाग क्र. ११ मध्ये रस्त्याच्या कडेला असलेल्या बिन चेंबरच्या नालीत पडून एका घोड्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.या ठिकाणी चेंबर बसविण्यात यावे अशी येथील नागरिकांची गेल्या कित्येक दिवसापासून ओरड होती. परंतु नगरपंचायतने त्याकडे दुर्लक्ष केले आणि एका मूक जनावरास आपला नाहक जीव गमवावा लागला.




