– मारेगाव तालुक्यातील टाकळी येथील प्रकार
– महिला शेतकऱ्याचा आमरण उपोषणाचा इशारा
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
विज जोडणी विनाच महावितरणने एका महिला शेतकऱ्यास अव्वाच्या सव्वा वीज देयक दिल्याचा धक्कादायक प्रकार मारेगाव तालुक्यातील कुंभा परिसरातील टाकळी येथे उघडकीस आला आहे.परिणामी महावितरणचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला असून न्याय न मिळाल्यास आमरण उपोषणाचा गर्भीत इशारा सदर शेतकरी महिलेने प्रशासनास दिला आहे.
मारेगाव तालुक्यातील कुंभा परिसरातील टाकळी येथील महिला शेतकरी सरला सुधाकर निवलकर यांच्या नावे तीन एकर शेती आहे.सिंचनाकरिता व्यवस्था व्हावी म्हणून त्यांनी रोजगार हमी योजनेतून शेतात विहीर करून घेतली. कृषी पंप करिता विज जोडणी मिळावी याकरिता २०२१ मध्ये ११६८५ रुपये डिमांड भरली.परंतु दोन वर्ष उलटूनही महावितरणने त्यांचे शेतात वीज जोडणी मात्र केली नाही.
सहा वर्षांपूर्वी पतीचे अकस्मात निधन झाल्याने तीन एकर शेतीत आपल्या कुटुंबाचा गाडा हाकणाऱ्या सरला यांना महावितरणने वीज जोडणी विनाच वीज देयक पाठवल्यावर प्रचंड धक्का बसला.महावितरणने सरला यांना तब्बल २१,९३० रु.वीज देयक पाठवल्याने प्रथमतः सरला या अचंबित झाल्या.लगेच त्यांनी ही धक्कादायक बाब गावातील काही सुज्ञ नागरिकांना सांगितली.
परिणामी गावातील नागरिकांनी महिला शेतकरी सरला यांना धीर देऊन मार्गदर्शन केले.सरला यांचे शेतात कपाशी, तूर व मिर्चीची लागवड केली आहे.मध्यावधित पावसाच्या सरी थांबल्याने उभ्या पिकांना वाचविता यावे करीता शेतात त्वरित विज जोडणी करण्यात यावी तसेच मला योग्य न्याय मिळावा अन्यथा आमरण उपोषणाचे हत्यार उपसणार असल्याचा ईशारा महिला शेतकरी सरला निवलकर यांनी प्रशासनाला दिला आहे.





