— वर्धा नदीवरील कोसारा जवळील पुलावरुन पुराचे पाणी, वाहतूक ठप्प
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
काही दिवसाच्या विश्रांतीनंतर ता. ३१ ऑगस्ट च्या रात्री झालेल्या अतिवृष्टीने नदी नाले ओसंडून वाहत असुन वर्धा नदीला पुर आल्याने खैरी-कोसारा-मार्गे वरोरा मार्ग बंद झाला आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर पावसाने हातातोंडाशी आलेला घास जातो की काय अशी भीती आता शेतकऱ्यांच्या मनामध्ये निर्माण झाली आहे.
तालुक्यात आत्तापर्यंत शेतीला पोषक असाच पाऊस असल्याने शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण होते. पीके डौलाने बहरत असतानाच काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने ता. ३१ ऑगस्ट रोजी रात्री कहर केला. पुर्ण दिवस उघाड दिल्याने निवांत असतानाच रात्री साडे सहा सात वाजेदरम्यान काळ्याकुट्ट ढगांनी एकत्र येत मेघ गर्जना, विजांचा कडकडाट, व बेधुंद वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. या पावसाळ्यातील रात्री झालेला पाऊस हा भयंकर होता अशी जनमानसात चर्चा आहे. रात्री झालेल्या पावसामुळे तालुक्यातील नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास जातो की काय अशी भीती आता शेतकऱ्यांच्या मनामध्ये निर्माण झाली आहे.
रात्री झालेल्या पावसामुळे पुन्हा एकदा तालुक्यातुन वाहणाऱ्या जीवनदायिनी वर्धा नदीला पुर आला असुन पुलावरुन पुराचे पाणी वाहत आहे.त्यामुळे या मार्गावरील वाहतुक वृत्त लिहीपर्यंत ठप्प झाल्याची व पुराचे पाणी वाढत असल्याची माहीती आहे.
