– शहा सर्रास खोटं बोलताय…!
– राहुल गांधींमुळे माझे जगणे ‘सुकर’
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी ९ ऑगस्ट रोजी लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर बोलताना राहुल गांधी यांनी मारेगाव तालुक्यातील जळका येथील कलावतीबाई यांचे घरी जाऊन मदतीचा गाजावाजा केल्याचे विधान केले.या विधानाविरोधात कलावती बाई कडाडल्या असून ‘राहुल गांधींमुळेच माझे जगणे सुकर झाले’ असुन ‘माझ्या नावाचा खोटा वापर केल्यास कायदेशीर कारवाईचा आधार घेईल’ असा सज्जड इशारा मारेगाव महिला काँग्रेस पक्ष व जिल्हा उपाध्यक्षा अरुणाताई खंडाळकर यांचे नेतृत्वात तहसीलदार मार्फत पंतप्रधानांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.
९ ऑगस्ट रोजी अविश्वास प्रस्तावावर बोलताना गृहमंत्री अमित शहा यांनी देशाची दिशाभूल केली असून माझ्या पतींनी आत्महत्या केल्यानंतर राहूल गांधी माझ्या घरी आल्यावरच मला आर्थिक मदत मिळाली.त्यावेळी तत्कालीन प्रदेश अध्यक्ष माणिकराव ठाकरे आणि सभापती अरुणाताई खंडाळकर यांनी पुढाकार घेऊन माझ्या घरी वीज जोडणी,नळ, टिन पत्रे यांचे सह घरकुल उपलब्ध करून दिले.विशेष म्हणजे कलावती बाईंना ही सर्व मदत २०१४ पूर्वी मिळाली असल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.
परिणामी देशाला खोटी माहिती देणे अशोभनीय आहे.मोदी काळात किसान निधी व्यतिरिक्त मला कोणतीही वेगळी मदत मिळाली नाही.गृहमंत्री अमित शहा यांनी मला कसल्याही प्रकारची विचारणा न करता माझ्या विषयी खोटी माहिती दिल्या बद्दल मी या घटनेचा निषेध करीत आहे असेही त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.
याशिवाय’भविष्यात माझ्या नावाचा खोटा वापर केल्यास मला कायदेशीर कार्यवाही चा आधार घ्यावा लागेल’ अशा आशयाचे निवेदन मारेगाव तालुक्यातील जळका येथील कलावती परशुराम बांदुरकर यांनी मारेगाव तालुका महिला काँग्रेस पक्ष व जिल्हा उपाध्यक्ष अरुणाताई खंडाळकर यांचे नेतृत्वात १० ऑगस्ट रोजी तहसीलदारांमार्फत पंतप्रधानांना दिलेल्या निवेदनातुन दिला आहे.
यावेळी कलावती परशुराम बांदुरकर,काँग्रेस जिल्हा उपाध्यक्षा अरुणाताई खंडाळकर, माजी जि.प.सदस्य अनील देरकर,जिल्हा महासचीव कांग्रेस कमिटी खालीद पटेल,माजी गटनेता न.प.मारेगांव उदय रायपूरे,अल्पसंख्यांक सेल मारेगाव तालुका अध्यक्ष शाहरुख शेख,तालुका अध्यक्ष कांग्रेस कमिटी मारोती गौरकार,आकाश भेले, जुनेद पटेल मंजुषा पोल्हे आदींसह शेकडो नागरिक व महिला उपस्थित होत्या.




