– सत्कार्यास अवघा समाज एकवटला
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
शहरातील प्रभाग क्र. १२ येथे निर्माणाधिन अवस्थेत असलेल्या इमारतीत दारूभट्टी स्थलांतरित होत असल्याने या विरोधात प्रचंड जन आक्रोश उफाळला असुन येथील नागरिकांनी १७ जुलै रोजी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात अर्धनग्न आंदोलन करून धार्मिक स्थळानजीक होत असलेल्या दारूभट्टीच्या स्थानांतरणास प्रचंड विरोध दर्शवला.यावेळी सत्कार्यास अवघा समाज एकवटल्याचे चित्र मारेगावकरांनी अनुभवले.
शहरातील एका दारूभट्टीच्या स्थानांतरणास वेग आला आहे.मारेगावातील प्रभाग क्रमांक १२ येथील चुन्नी पटेल ले-आउट मध्ये निर्माणाधीन अवस्थेत असलेल्या इमारतीत ही दारूभट्टी स्थानांतरित करण्यात येणार असल्याची कुणकुण येथील नागरिकांना लागली.
शहरातील चुन्नी भाई पटेल लेआउट येथुन अवघ्या हाकेच्या अंतरावर बुद्ध विहार हे बुद्ध धर्मीयांचे प्रार्थना स्थळ असल्याने येथे दारू भट्टी स्थानांतरित करू नये अशा आशयाचे निवेदन न.प. मुख्याधिकाऱ्यांसह जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले होते.

दरम्यान १७ जुलै रोजी सकाळी ९ वाजेपासून शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात दारूभट्टीचे स्थानांतरणास विरोध दर्शवत येथील नागरिकांनी हाताला काळी पट्टी बांधून अनोखे अर्धनग्न आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधले.
यावेळी आंदोलन स्थळी आंदोलक विलास रायपुरे, हेमंत नरांजे,चांद बहादे,गजानन चंदनखेडे ,आकाश भेले, ज्ञानेश्वर धोपटे,अनिल गेडाम यांचेसह दिपक डोहने,बंटी बभाळे सह प्रभाग क्र.१२ मधील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.




