— उपचारादरम्यान चंद्रपूर रुग्णालयात मृत्यू
लोकशस्त्र न्युज नेटवर्क/ मारेगाव
नरसाळा येथे एका ४० वर्षीय शेतकऱ्याने ता.२५ सप्टेंबर रोजी सकाळी शेतात विष प्राशन केले, मात्र चंद्रपूर येथील रुग्णालयात उपचारादरम्यान ता. २६ सप्टेंबर रोजी शेतकऱ्याचा मृत्यू झाला.
तालूक्यातील नरसाळा येथे शैलेंद्र सोनबा उईके वास्तव्यास होते. वडिलोपार्जित शेती असल्याने शेतीवरच कुटूंबाचे भरणपोषण होते. निसर्गाची सतत अवकृपा असल्याने उत्पन्नात येणारी घट व त्यामुळे घ्यावे लागलेले कर्ज ही विवंचणा मृतकास चैन पडू देत नसल्याची माहीती असून आलेल्या नैराश्यातून शैलेंद्र यांनी आत्महत्या केली असावी अशी चर्चा आहे.
दरम्यान ता. २५ सप्टेंबर रोजी मृतक शैलेंद्र हे सकाळी शेतात जातो असे घरी सांगून गेले ते न येण्यासाठीच. शेतात गेल्यावर त्यांनी तणनाशक फवारणी औषध प्राशन केले व औषध प्राशन केल्याची माहिती आपल्या नातलगांना दिली. माहिती मिळताच जवळील नातलगानी त्यांना मारेगाव येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथील शासकीय रुग्णालयात भरती केले असता उपचारादरम्यान शैलेंद्र यांचा गुरुवार ता. २६ सप्टेंबर रोजी अंदाजे पाच वाजेदरम्यान मृत्यू झाला. त्याचे पश्चात आई, पत्नी व दोन मुली असा परिवार आहे.
