– मध्यरात्री तीन ट्रॅक्टर वरती जप्तीची कारवाई
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
मुरुमाची चोरटी वाहतूक करणाऱ्या तीन ट्रॅक्टर वरती मारेगांव महसुल विभागाने पाच मे रोजी मध्यरात्री काळ्या कुट्ट अंधारात मार्डी येथील पेट्रोल पंपानजीक जप्तीची कारवाई करून अवैध मुरूम उत्खननाला आळा घालण्याचा प्रयत्न करीत असल्याचे पुनश्च एकदा दाखवून दिले आहे.
तालुक्यात गौणखनिज उत्खनन जोमात सुरू आहे. दरम्यान गोपनीय माहितीच्या आधारे पाळत ठेवत ५ मे रोजी मध्यरात्री एक वाजता मार्डी येथील पेट्रोल पंपानजीक मुरुमाची चोरटी वाहतूक करणारे तीन ट्रॅक्टर मारेगाव महसूल विभागाने रंगेहात पकडले.
रत्नाकर देवराव जुमळे, अभय जुमळे, सुबोध शर्मा रा.मार्डी अशी सदर ट्रॅक्टर मालकांची नावे असून तीनही ट्रॅक्टर मारेगाव येथील तहसील कार्यालयात जमा करण्यात आले आहे.
सदर जप्तीची कारवाई मंडळ अधिकारी मार्डी अमोल घुगाने यांचेसह तलाठी शिंगणे, तलाठी कुडमेथे, मार्डी येथील कोतवाल लहू भोंगळे, वाहन चालक विजू कनाके यांनी फत्ते केली.





