– शेकडो हेक्टर वरील पिकांचे प्रचंड नुकसान
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
काही दिवस उसंत घेतलेल्या पावसाने तालुक्यात बुधवारी रात्री पासून पुनश्च एकदा बरसायला सुरुवात केली.परिणामी ‘वर्धा’ नदीने आपले विक्राळ रूप दाखवले. नदीला आलेल्या पुराने तालुक्यावर ‘बॅक वॉटर’ चे संकट उभे ठाकले आहे.परिणामी मारेगाव तालुक्यात ‘जल-जन कोंडी’ उद्भवली आहे.शिकडो हेक्टर वरील पिके ‘बॅक वॉटरने’ कवेत घेतली.यात पिके पुरती खरडुन शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
जून महिना कोरडा गेल्यानंतर पावसाने जुलै महिन्यात सगळीकडे हाहाकार माजविला आहे.यावर्षी मारेगाव तालुक्यातही जुलै महिन्यातला रेकॉर्ड ब्रेक पाऊस सुरू आहे.परिणामी अवघ्या तालुक्यात ‘जलप्रलय’ पहावयास मिळत आहे.

बुधवारी रात्री झालेल्या पावसाने वर्धा नदी फुगली. याची प्रचंड जवळ कोसारा गावाला बसली आहे. येथील ८ घरांची पडझड होत पुराचे पाणी शेतात शिरल्याने शेतांना पुरते तलावाचे रुप आले आहे.परिणामी शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

तालुक्यातील आपटी,दांडगाव, दापोरा,चिंचमंडळ या गावांना वर्धा नदीला आलेल्या पुरामुळे ‘बॅकवॉटरचा’ फटका बसल्याने शेत-शिवार दिसेनासे झाले आहे. हजारो हेक्टर वरील पिके बॅक वॉटरने कवेत घेतल्याने शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
वर्धा नदीने नाल्याची वाट अडवून धरल्याने काल सायंकाळी दापोरा नाल्यावरील पुलावरून पाच ते सहा फूट पाणी वाहत होते. परिणामी परिसरातील शेत शिवारातही पाणी शिरले होते. सद्यस्थितीत पुलावरील पाणी ओसरत असले तरी याची प्रचंड झळ बळीराजाला बसली आहे.

प्रशासन अलर्ट मोडवर असून तालुक्यात उद्भवलेल्या जलप्रालयाचे युद्ध स्थळावर पंचनामे करून शासन दरबारी मांडण्याची प्रक्रिया सुरू आहे.




