— खैरगाव बिट मधिल घटना, नागरिकात दहशत
लोकशस्त्र न्यूज नेटवर्क : मारेगाव
ता.४ सप्टेंबर रोजी मार्डी बिट परिसरात वाघाने दोन गायीवर हल्ला करून दोन्ही गायी ठार झाल्याची घटना ताजी असतानाच ता. ५ रोजी खैरगाव बीट परिसरात वाघाने एका दिड वर्षीय वासराचा फडशा पाडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्याने परिसरातील नागरिकांत प्रचंड दहशत आहे.
सदर जंगल परिसरात हिंस्र प्राण्यांचा वावर हा नेहमीचाच आहे. अधून मधून या परिसरात वाघोबाचे दर्शन परिसरातील नागरिकांना नित्याचेच झाले आहे. परंतु पशुधनाला चराईकरिता याच परिसरात न्यावे लागत असल्याने स्थानिक नागरिकांचाही नाईलाज आहे.
दरम्यान ता.५ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजेदरम्यान गुराखी गुरांना चारण्यासाठी खैरगाव बीट कक्ष क्रमांक ६९ मध्ये घेऊन गेले, मात्र जंगल परिसरात वासरु कळपामध्ये चरत असतांना घनदाट झुडपाच्या आडोशाला दडी मारून बसलेल्या वाघोबाने वासरावर अचानक जीवघेणा हल्ला करुन वासराचा फडशा पाडला. या घटनेबाबत माहीती मिळताच वनविभागाची चमु घटना स्थळी पोहचत पंचनामा करुन पुढील प्रक्रीया सुरु आहे.
नामदेव रामपुरे असे संबंधित पशुधन मालकाचे नाव आहे. तूर्तास आपले पशुधन गमविलेल्या नामदेव यांचेवर आर्थिक संकट कोसळले असून शासन मदतीकडे त्यांचे डोळे लागले आहे.
लागोपाठ दोन दिवसात मार्डी बीट मध्ये दोन गाई तर खैरगाव बीट जंगल परिसरात वाघाच्या हल्ल्यात वासरु ठार झाल्याने नागरिक, परिसरातील शेतकरी, शेतमजूरांमध्ये भितीचे वातावरण आहे.
वनविभागाच्या चमु दोन्ही घटना स्थळ व परिसरात कार्यरत असून मार्डी बीट मधील घटना स्थळ परिसरात ३ कॅमेरा तर खैरगाव बिट जंगल परिसरात २ कॅमेरा लावण्यात आले असल्याची माहीती वनविभागाकडून देण्यात आली. नागरिक, शेतकरी शेतमजुरांनी एकटे न जाता घोळक्यात जावे, जास्त वेळ वाकून काम करु नये, व सतर्क रहावे असे आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आहे.




