– दारु विक्री परवान्याआड फसवणूक
– सात जणांविरुद्ध गुन्हे दाखल
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
दारू विक्री परवान्याआड मारेगावातील एका ठेकेदार युवकाची तब्बल ३५ लाख रुपयाने फसवणूक झाल्याची खळबळजनक घटना युवकाने मारेगाव पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केल्यानंतर उघडकीस आली आहे.मित्राच्या माध्यमातून नंदुरबार जिल्ह्यातील एका महिलेचा चिल्लर दारू विक्रीचा परवाना उपलब्ध असल्याची माहिती मिळाली.सदर परवाना आपल्या नावे करून घेण्यासाठी तरुण ठेकेदाराने ३५ लाख रुपये दिले.परंतु सदर दारू विक्री परवाना आधीच दुसऱ्या एका व्यक्तीस हस्क्कातांतरित केला असल्याची धक्कादायक बाब तरुण ठेकेदाराच्या लक्षात येताच आपणास गंडविल्याचे तरुणाच्या लक्षात आले.घटनेची तक्रार मारेगाव पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आली असून ७ जनांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
मयुर संजय लव्हाळे (२५) रा.मारेगाव असे फिर्यादी ठेकेदाराचे नाव आहे.तर मयत साहेबराव बारीकराव कानडे, गोपाळ साहेबराव कानडे, चंद्रशेखर साहेबराव कानडे,चेतन पाटील चारही रा. चोपडा जि.जळगाव,राजु जयस्वाल रा.वाघापुर जि. यवतमाळ,छबुबाई वसावे,पुरुषोत्तम वसावे दोन्ही रा. भांगडा ता.जि.नंदुरबार असे नियोजीत कट रचुन तरुण ठेकेदार युवकाची फसवणूक करणाऱ्या संशयित आरोपींची नावे आहे.
दरम्यान दारू विक्री व्यवसायाकरिता परवाण्याच्या शोधात चौफेर पालथे घालत असता १६ डिसेंबर २०२० रोजी तरुण ठेकेदाराच्या वडीलास छबुबाई शंकर वसावे रा.भांगडा जि.नंदुरबार यांचेकडे सि.एल. (3) ३६ कोठला जि.नंदुरबार हा दारू विक्री परवाना उपलब्ध असल्याची माहिती मिळाली.यावेळी साहेबराव कानडे, गोपाळ कानडे,चंद्रशेखर कानडे व चेतन पाटील यांचे मध्यस्थीने झालेल्या बैठकीत सदर दारू विक्रीचा परवाना तरुण ठेकेदाराच्या नावे हस्तांतरित करू ही बाब अधोरेखित झाली.
यावेळी ६७ लाख ५० हजार रुपये किंमतीच्या दारु विक्री परवान्याचा खरेदी व्यवहार माझ्याशी करा…छबुबाई सही करायला येऊन जाईल असे साहेबरावने बैठकीत सांगितले.परिणामी दारु विक्री परवाण्याच्या हस्तांतरणाची रक्कम देवाण-घेवाण झाली.टप्प्याटप्प्याने युवकाकडून ३५ लाख रुपयाची रक्कम उकळली गेली.
४ फेब्रुवारी २०२१ रोजी ठेकेदार युवक पोलीस अधीक्षक उत्पादन शुल्क विभाग जि.नंदुरबार यांचे कार्यालयात आपल्या नावे हस्तांतरित झालेला दारू विक्रीचा परवाना घेण्यासाठी गेला असता सदर दारू विक्री परवाना २०१६ मध्ये छबुबाई वसावे हीने अमोल बागुल रा.नाशीक यांना हस्तांतरित केल्याची धक्कादायक बाब तरुण ठेकेदाराच्या लक्षात आली.
अकल्पित घडल्याने गोंधळलेल्या युवकाने रक्कम परत मागण्याचा तगादा साहेबरावच्या मागे लावला.परिणामी साहेबरावने वणी येथे येवून त्यांचे घराची रोटरी करुन दिली.परंतु इथेही पुरेशा कागदपत्रां अभावी ही रोटरी मान्य नसल्याची बाब तरुण ठेकेदाराच्या लक्षात आल्याने याबाबत साहेबरावला कळविले असता त्याने ‘मी सर्व रक्कम व्याजासह परत करत आहो’ असे म्हणुन वेगवेगळ्या रकमेचे ३८ लाख रुपयांचे चेक तरुण ठेकेदारास दिले.परंतु चेक बँकेत वटविण्यास टाकले असता बाऊंस झाले.
तुर्तास या धक्कादायक घटनेतील मध्यस्थ व दारु विक्री परवानाधारक अशा सातही संशयित आरोपी विरुद्ध मारेगाव पोलीस स्टेशनला फसवणुकीची तक्रार दाखल करण्यात आली असून घटनेचा तपास मारेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार जनार्दन खंडेराव व नपोका अजय वाभीटकर करीत आहे.




