– दखल न घेतल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा
– तालुका भाजपचे ठाणेदारांना निवेदन
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
शहरासह तालुक्यातील कुंभा,मार्डी, नवरगाव येथे अवैध धंद्यांना कमालीचा उत आला असून अवैध धंदेवाल्यांची अरेरावी सर्वत्र दिसून येत आहे.यात गोवंश तस्करीनेही आपले डोके वर काढले आहे.परिणामी अवैध धंद्यांना तात्काळ लगाम लावा अन्यथा पोलीस स्टेशन समोर तीव्र आंदोलन छेडू अशा आशयाचे निवेदन ३ ऑगस्ट रोजी तालुका भाजपने ठाणेदारांना दिलें.
शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात अवैध धंदे चांगलेच फोफावले आहे.यात मटका, जुगार, दारू विक्री सह गोवंश तस्करीही मोठ्या प्रमाणात सुरू आहे.मारेगाव तालुक्यात सुरू असलेल्या अवैध व्यवसाया विरोधात आता तालुका भाजप सरसावली असून ३ ऑगस्ट रोजी ठाणेदारांना याबाबतचे निवेदन देण्यात आले.
तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने शेतकरी पुरता मेटाकुटीस आला आहे.आधीच आर्थिक विवंचना त्यात शहरासह तालुक्यातील कुंभा, मार्डी ,नवरगाव परिसरात फोफावलेल्या जुगार व अवैध वरली मटक्यामुळे शेतकरी यात पुरता भरडला जात आहे.तालुक्यात गोवंश तस्करीही मोठ्या प्रमाणात सुरू असून यालाही लगाम लावण्याची गरज असल्याची बाब सदर निवेदनात नमूद करण्यात आली आहे.
३ ऑगस्ट रोजी दिलेल्या निवेदनाची दखल ७ दिवसाचे आत घेतली न गेल्यास स्थानिक पोलीस स्टेशन समोर तीव्र आंदोलन छेडू असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
भाजपा तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर चिकटे,प्रशांत नांदे,अनुप महाकुलकार,अविनाश लांबट,पवन ढवस,आनंद पचारे,प्रसाद ढवस,रवि टोंगे,शशीकांत आंबटकर,गणेश झाडे,दत्तु लाडसे,सुहास वरारकर,दुष्यंत निकम,विजय सोरटकर,लीलाधर काळे,मारोती तुराठाकर,ज्ञानेश्वर सामनकर,शेखर चिंचुलकर, वैभव पवार यांचेसह शेकडो भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.




