– शहरास शेकडो समस्यांचा विळखा
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
मारेगाव शहरास सद्यस्थितीत विविध समस्यांनी विळखा घातला आहे.येथील आठवडी बाजारात मोकाट जनावरांची ‘झुंबड’ उडत असतानाच शहराच्या मध्यातून जाणाऱ्या वणी-यवतमाळ राज्य महामार्गावरही मोकाट जनावरांचे ‘झुंड’ वाहन चालकांची वाट अडवून धरत असल्याने वाहन चालकांतून प्रशासनाविरुद्ध कमालीचा रोष व्यक्त केला जात आहे.
शहरातील नागरिकांचा मुख्य व्यवसाय शेती असल्याने येथे गुराढोरांचे प्रमाण जास्त आहे. जनावरांच्या मालकांचे त्याचे जनावरांकडे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने ही जनावरे शहरातील मुख्य रस्त्यावर दिवस-रात्र फिरताना दिसुन येतात.काही जनावरे चक्क रस्त्याच्या मधोमध ठाण मांडून बसलेली असतात.
शहरातील विविध प्रभागांत मोकाट जनावरांनी कमालीचा हैदोस माजविला असुन सकाळपासून सायंकाळपर्यंत ही जनावरे भर रस्त्यात ठाण मांडून बसुन असतात.काही जनावरे दिवसभर या गल्लीतून त्या गल्लीत फिरत असतात.मोकाट गुरांना कोंडवाड्यात टाकणे बाबत प्रशासनही उदासीन दिसून येत आहे.
परिणामी मोकाट जनावरांमुळे एखादा अपघात होऊन नाहक बळी गेल्यावरच प्रशासनास जाग येईल काय…? असा सुर जनसामान्यातून उमटु लागला आहे.




