– लिंबो स्केटिंग मध्ये जागतिक विक्रम
– तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
मारेगाव तालुक्यातील बोटोनी येथील मनस्वी विशाल पिंपरे या चिमुकलीने लिंबो स्केटिंग मध्ये २५ मी.लांब अवघ्या १६.५ सेमी उंच (उभ्या मोबाईलच्या उंची एवढ्या) जागेतुन यशस्वी दौड पूर्ण करून जगातील सगळ्यात लहान वयाची ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर’ ठरली आहे.जागतिक लेव्हलवर मारेगाव तालुक्याचा झेंडा फडकवत मनस्वीने तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
मनस्वी विशाल पिंपरे (५ वर्ष.७ म.) ही चिमुकली मुळची मारेगाव तालुक्यातील बोटोनी येथील. वयाच्या तिसऱ्या वर्षापासून मनस्वीस स्केटिंगच्या वेडाने ग्रासले.परिणामी मनस्वी ने आपल्या वडिलांसह पुणे येथे कुच केली.तिथे ‘रॉक ऑन व्हील’ अकॅडमीत विजय मलजी यांचे मार्गदर्शनात स्केटिंगचे धडे गिरवण्यास सुरुवात केली.
तूर्तास मनस्वीने इवल्याशा वयात अनेक रेकॉर्ड आपल्या नावे केले आहे.मनस्वी कडे असलेल्या पदकांची यादीही प्रचंड मोठी आहे.

दरम्यान नुकत्याच पार पडलेल्या लिंबू स्केटिंग प्रकारात मनस्वीने १३ वर्षीय मुलीचा विक्रम मोडीत काढला.मनस्वीने २५ मीटर लांब व १६.५ सेमी उंच ( मोबाईल उभा धरल्यास तयार होईल इतकी जागा ) जागेतून लिंबो स्केटिंग मध्ये यशस्वी दौड पूर्ण करत जगातील सगळ्यात कमी वयात या प्रकारात विक्रम करण्याचा बहुमान मिळवला.परिणामी मनस्वीचे नाव ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ मध्ये सुवर्णाक्षरात कोरले गेले.

अवघ्या अडीच वर्षाच्या काळात अथक परिश्रम करून आपल्या नावासह गावाचे तसेच तालुक्याचे नाव मनस्विने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये कायम केले आहे.परिणामी अवघ्या साडेपाच वर्षाची ही चिमुकली कौतुकास पात्र आहे.






