— “काळ सरला, वाटा बदलल्या,पण मैत्रीच्या धाग्यांवरील ओलावा मात्र तसाच राहिला.
— “आठवणींचे घरटे आदर्श हायस्कूल, मारेगाव
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
मोरेश्वर ठाकरे : मारेगाव.
आयुष्याच्या विशाल प्रवासात काही माणसं काळाच्या वळणांवर हरवून जातात. काही चेहरे आठवणींच्या धूसर पडद्याआड लुप्त होतात, पण काही नाती अशी असतात, ज्यांना अंतर तोडू शकत नाही, काळ विसरू शकत नाही आणि परिस्थिती पुसू शकत नाही.ती नाती फक्त पुन्हा भेटण्याची वाट पाहत असतात. एखाद्या जुन्या घरट्यात परतणाऱ्या पाखरांसारखी…!

आदर्श हायस्कूल, मारेगाव येथील इयत्ता दहावी २००२-०३ च्या विद्यार्थ्यांचा स्नेहमिलन सोहळा म्हणजे अशाच जिवाभावाच्या ऋणानुबंधांना पुन्हा नव्याने स्पर्श करणारा, डोळ्यांच्या कडा नकळत ओलावून टाकणारा आणि मनाच्या कप्प्यात दडलेल्या आठवणींना अलगद जागवणारा भावस्पर्शी क्षण ठरला.
तब्बल तेवीस वर्षांपूर्वी एकाच वर्गात बसणारी, एकाच घंटेसोबत धावत सुटणारी, एकाच मैदानावर स्वप्नं रंगवणारी आणि आयुष्याच्या कोऱ्या पाटीवर भविष्याची अक्षरं कोरणारी ती पाखरे, आज पुन्हा एकदा आपल्या जुन्या घरट्यात एकत्र आली होती. काळाने प्रत्येकाला वेगवेगळ्या दिशांना नेले. कोणी नोकरीत रमले, कोणी संसाराच्या जबाबदाऱ्यांत गुरफटले, कोणी शहरांच्या गर्दीत स्वतःला हरवून बसले. पण मनाच्या एखाद्या शांत कोपऱ्यात “आपली शाळा” आणि “आपली माणसं” मात्र आजही तितकीच जिवंत होती.
शाळेच्या आवारात पाऊल टाकताच प्रत्येकाचं मन नकळत भूतकाळाच्या पायवाटेवरून चालू लागले. तीच वर्गखोली, तेच बाक, तेच मैदान आणि त्या भिंतींवर अजूनही जणू बालपणाच्या हसऱ्या सावल्या फिरताना जाणवत होत्या. क्षणभरासाठी वाटलं काळ थांबला आहे. आणि आयुष्य पुन्हा एकदा शाळकरी दिवसांत परतले आहे.

अनेक वर्षांनंतर गुरुजनांना भेटताना डोळ्यांत नकळत पाणी दाटून आले. कधी गृहपाठ न केल्यावर मिळालेली शिक्षा, कधी चांगल्या गुणांवर पाठीवर पडलेली शाबासकीची थाप, कधी चुकीनंतर प्रेमाने दिलेला सल्ला त्या प्रत्येक क्षणामागे दडलेलं गुरुजनांचं प्रेम आज अधिक स्पष्टपणे जाणवत होतं. त्या शिक्षकांच्या डोळ्यांत विद्यार्थ्यांबद्दल दिसणारा अभिमान हा कोणत्याही पुरस्कारापेक्षा मोठा होता. कारण विद्यार्थ्यांनी कितीही मोठं व्हावं, कितीही उंच भरारी घ्यावी, शिक्षकांच्या मनात ते कायम त्यांचीच लेकरं राहतात.
आजच्या भेटीत मित्रांमध्ये कोण मोठं, कोण लहान, कोण श्रीमंत, कोण सामान्य असा कुठलाही भेद उरला नव्हता. सगळे पुन्हा एकदा तेच निष्पाप शाळकरी मित्र झाले होते. जुन्या खोड्यांवर हास्याचे फवारे उडत होते. कोणी शिक्षकांच्या आठवणी सांगत होते, कोणी जुन्या फोटोंमागच्या गोष्टी आठवत होते. तर काहींच्या डोळ्यांत शब्दांविना बोलणारा आठवणींचा ओलावा दाटून आला होता. आज काढलेला समूह फोटो हा केवळ छायाचित्र नव्हताच. तो काळाच्या प्रवाहात हरवलेल्या मैत्रीचा पुन्हा सापडलेला ठेवा होता. त्या एका चित्रात कित्येक भावनांचे रंग दडले होते, यशाचं समाधान, भेटीचा आनंद, विरहाची हलकी वेदना, आणि पुन्हा भेटण्याचं न बोललेलं वचन…!
कार्यक्रम संपल्यानंतरही काही शिक्षक स्वतः खाली वाकून रिकामे ग्लास उचलताना दिसले आणि तो क्षण मनाला खोलवर भिडून गेला. त्या क्षणी जाणवले मोठेपणा हा पदात नसतो तर तो संस्कारांत असतो, वागण्यात असतो. आणि आयुष्यभर इतरांसाठी जगण्यात असतो.
राष्ट्रगीताच्या वेळी तर संपूर्ण वातावरणात एक वेगळंच पावित्र्य दाटून आले होते. शिक्षकांचा भारलेला आवाज, विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा अभिमान आणि डोळ्यांत दाटलेल्या भावना पाहताना जाणवले “शाळा” ही केवळ शिक्षण देणारी जागा नसते, ती माणसाला माणूस बनवणारी संस्कारांची पवित्र भूमी असते.

“आदर्श हायस्कूल” हे फक्त नाव नाही, तर हजारो विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देणारा संस्कारांचा दीप आहे. आज प्रत्येक विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रात स्थिरावला असला, तरी त्यांच्या यशाच्या मुळाशी या शाळेची शिदोरी आणि गुरुजनांचे आशीर्वादच आहेत, याची जाणीव प्रत्येकाच्या मनात दाटून आली.

काळ पुढे जात राहतो, जीवन बदलत राहते माणसं दूर निघून जातात पण काही ऋणानुबंध असे असतात, जे आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत मनात हळुवार धडकत राहतात…! आजचा हा स्नेहमिलन सोहळा म्हणजे केवळ भेट नव्हती… तो हरवलेल्या पाखरांचा पुन्हा घरट्यात परतण्याचा क्षण होता… आठवणींच्या ओलाव्यात न्हालेला. मैत्रीच्या सुगंधाने दरवळलेला, आणि आयुष्यभर मनात जपून ठेवावा असा…!





