लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
पवनी ता. प्रतिनिधी : प्रदीप घाडगे
ग्रामीण परंपरा, संस्कृती व श्रद्धेचे दर्शन घडविणारा तान्हा पोळा उत्सव यंदा पवनीत विशेष उत्साहात साजरा होणार आहे. नागपूर रोडवरील माँ भंगाराम देवी मंदिर परिसरात शनिवार, दि. २३ ऑगस्ट २०२५ रोजी सायं. ५.३० वाजता नंदीबैल सजावट व वेशभूषा स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेत आकर्षक पद्धतीने सजविलेल्या नंदीबैलांचे दर्शन घडणार असून ग्रामीण जीवन, भक्तीभाव आणि सांस्कृतिक परंपरेची झलक अनुभवायला मिळणार आहे. वेशभूषा स्पर्धेत बालक व युवक भगवान श्रीराम, श्रीकृष्ण, भगवान शंकर, राधा, संत-महात्मे तसेच समाजसुधारक यांच्या भूमिका साकारणार आहेत.

स्पर्धेसाठी पहिल्या पाच विजेत्यांना सायकली तर इतर स्पर्धकांना प्रोत्साहनपर भेटवस्तूंची व्यवस्था करण्यात आली आहे. “लहानग्यांच्या वेशभूषेतून संस्कृतीचे संवर्धन तर नंदीबैल सजावटीतून ग्रामीण जीवनशैलीचे महत्त्व अधोरेखित होईल. त्यामुळे नागरिकांनी व लहानग्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे,” असे आवाहन माँ भंगाराम देवी नवरात्र उत्सव समितीचे अध्यक्ष दत्तू मुनारतीवार, उपाध्यक्ष संदीप नंदरधने व सचिव प्रमोद मेश्राम यांनी केले आहे.





