– भर पावसात मनसे नेते राजु उंबरकर यांच्या नेतृत्वात हजारों शेतकऱ्यांचा आक्रोश
– महावितरणकडून लिखित आश्वासन
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
महावितरण विभागाचा कारभार ढेपाळल्याने शेतकरी व सामान्य जनता वैतागली असुन वेळी अवेळी होत असलेले भारनियमन, वारंवार खंडित होणारा विद्युत पुरवठा व त्यामुळे होत असलेले रब्बी पीकाचे नुकसान, हा मुद्दा उचलुन धरत ता.२८ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राजु उंबरकर यांच्या नेतृत्वात तथा
तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने व तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत महावितरण विरोधात “झटका मोर्चा” तहसिल कार्यालयात धडकत तहसिलदार, तथा विद्युत वितरण अधिकारी मारेगाव यांना निवेदन देण्यात आले. याच वेळी विद्युत वितरण कडुन लिखित आश्वासन देण्यात आले.
वन संपदेनी नटलेला मारेगाव तालुका आदिवासीबहुल असुन तालुक्यात कुठलाही उद्योग नसल्याने शेती हाच मुख्य व्यवसाय आहे. मागील पाच वर्षांत अस्मानी संकटामुळे शेतकरी उध्वस्त होत आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेत जीवन संपवत असुन आता तर आत्महत्याग्रस्त तालुका अशी नवीन ओळख निर्माण होत असुन याबाबत ठोस निर्णय होणे आवश्यक असतांना तसे काही होतांना दिसत नसुन
आता तर प्रशासन सुध्दा जन सामान्यांच्या अडचणी सोडविण्यात असमर्थ दिसत असल्याचे सुतोवाच जनसामान्यात आहे.
निसर्गाच्या चक्रव्यूहात अडकलेला शेतकरी खरीपातील उत्पादणात घट आल्याने रब्बी हंगाम व खरिपातील कापूस व तुर या नगदी पीकांना पाणी आवश्यक असुन पाणी असतांना महावितरण कडून वारंवार खंडित होणारा विद्युत पुरवठा व वेळी अवेळी होणारे भारनियमन यामुळे पीकांना पाणी देण्यात अडसर ठरत आहे. तालुक्यात ट्रान्सफार्मर, विजेचे खांब आणि वाहिन्या व्यवस्थित नसल्यानें शेतकऱ्यांना सिंचनासाठी वीज मिळत नाही.
२०१८ पासून ज्या शेतकऱ्यांनी वीज जोडणीसाठी अर्ज केले, ती जोडणी अद्यापही झालेली नाही, उच्चदाब आणि कमी दाबामुळे अनेक ट्रान्सफार्मर जळालेले आहे. हे ट्रान्सफार्मर बदलून त्याऐवजी दुसरे ट्रान्सफार्मर बसवून देण्यासाठी शेतकरी वारंवार लेखी व मौखिक तक्रारी करतात मात्र यांना महावितरणचे कर्मचारी आणि अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देऊन त्यांच्या तक्रारीला केराची टोपली दाखवत असल्याने ता. २८ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेते राजु उंबरकर यांचे नेतृत्वात हजारो शेतकरी व मनसे कार्यकर्ते तहसिलदार कार्यालयावर धडकत तहसिलदार उत्तम निलावाड, महावितरणचे उपकार्यकारी अभियंता शैलेंद्र पाटील, यांना निवेदन दिले.

यावेळी कनिष्ठ अभियंता अशिष पवार, सहा.अभियंता अतुल आत्राम,मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष रोगे, तालुकाध्यक्ष रुपेश ढोके, ता.उपाध्यक्ष उदय खिरटकर, नबी शेख, शहराध्यक्ष चांद बहादे, नगरसेवक अनिल गेडाम, नगरसेविका अंजुम शेख, धनंजय त्रिंबके, रोशन शिंदे, किशोर मानकर, जम्मू शेख, महीला सेनेच्या अर्चना बोदाडकर, प्रिया लभाणे, विद्या हिवरकर, वैशाली तायडे, सिंधू बेसकर, यांचेसह हजारो शेतकरी उपस्थित होते.
शेती हा मुख्य व्यवसाय असतांना शासन प्रशासनाकडून शेतकऱ्यांची नेहमीच थट्टा केली जात आहे. एकीकडे निसर्गाचा लहरीपणा तर दुसरीकडे शासन प्रशासनाचे दुर्लक्षीत धोरण यामुळे शेतकरी घायकुतीस आला आहे. परंतु यापुढे शेतकऱ्यांची थट्टा खपवून घेतली जाणार नाही,अन्यथा मनसे स्टाईल उत्तर देऊ.
राजु उंबरकर,
नेता महाराष्ट्र नवनिर्माण सेना.

मागणी नुसार शेतकऱ्यांना ८ तास अखंडित वीजपुरवठा व गावठाण फिडर वरील पुरवठा सुरळीत करुन २४ तास वीज पुरवठा चालू राहील. त्याचं बरोबर तालुक्यातील सर्व ट्रान्सफार्मर येत्या २ दिवसात दुरुस्त करण्यात येईल.
शैलेंद्र पाटील,
उपकार्यकारी अभियंता
महावितरण, मारेगाव.




