– मारेगाव शहरातील घटना
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
मारेगाव शहरातील व तूर्तास चंद्रपूर येथे वास्तव्यास असलेल्या एका ३८ वर्षीय विवाहित युवकाने मारेगावातील स्वतःच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुःखद घटना २९ नोव्हेंबर रोजी सकाळी उघडकीस आली.
सचिन विठ्ठलराव पिदुरकर (३८) रा.मारेगाव (सद्यस्थितीत चंद्रपूर) असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या विवाहित युवकाचे नाव आहे.ते चंद्रपूर येथील एका खाजगी कंपनीत नोकरीवर होते. गत ८-१० दिवसा आधीच मृतक सचिन मारेगावला आले होते.
दरम्यान २९ नोव्हेंबर रोजी सकाळी सचिन यांच्या मारेगाव येथील स्वगृही त्यांचा मृतदेह फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.सदर घटनेची माहिती कुटुंबियांनी तात्काळ मारेगाव पोलिसांना दिली. पोलिसांनी पंचनामा करून मृतक सचिन यांचा मृतदेह मारेगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनाकरीता रवाना केला.
तूर्तास सचिन यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले हे कळू शकले नाही.मृतक सचिन यांचे पश्चात पत्नी, मुलगा,भाऊ असा आप्तपरिवार असल्याची माहिती आहे.




