– ६१ व्या रोलर स्केटिंग स्पर्धेत करणार महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
स्केटिंग असोसिएशन महाराष्ट्र द्वारा आयोजित विरार, मुंबई येथे पार पडलेल्या ३३ व्या महाराष्ट्र रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप २०२३ मध्ये ५ ते ७ वर्ष मुलींच्या वयोगटात कु.मनस्वी विशाल पिंपरे हिने ४०० मीटर स्केटिंग रेस मध्ये सुवर्णपदक तर २०० मीटर स्केटिंग स्पर्धेमध्ये रजत पदक पटकावले.परिणामी येत्या १५ ते २५ डिसेंबर दरम्यान चेन्नई येथे होणाऱ्या रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत मनस्वी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे.
मागील महिन्यात पुणे येथे जिल्हास्तरीय स्केटिंग स्पर्धेत एक सुवर्ण व एक रजत पदक मिळवून मनस्वीची राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेकरिता निवड झाली होती. त्यानंतर विरार येथे झालेल्या महाराष्ट्र स्केटिंग स्पर्धेमध्ये मिळालेल्या सुवर्ण यशामुळे मनस्वी येत्या १५ डिसेंबर ते २५ डिसेंबर दरम्यान चेन्नई येथे होणाऱ्या ६१ व्या नॅशनल रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप मध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे.तुर्तास मनस्वी रॉक ऑन व्हील स्केटिंग अकॅडमी कात्रज, पुणे येथे प्रशिक्षक विजय मलजी यांच्या मार्गदर्शनात स्केटिंगचे प्रशिक्षण घेत असून मनस्वीसह प्रशिक्षक गेल्या दोन महिन्यापासून अथक परिश्रम घेत आहेत.
मनस्वी ५ ते ७ वयोगटात ओव्हर ऑल टाइमिंग मध्ये पहिली असून राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राला सुवर्णपदक मिळावे यासाठी कसोशीने प्रयत्न करत आहे.परिणामी चिमुकल्या मनस्वीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.




