– तहसीलदारांमार्फत जिल्हा पुरवठा निरीक्षकांना निवेदन
– आंदोलनाचा इशारा
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
सण उत्सवापूर्वी शासन स्तरावरून गरीब,शेतकरी तसेच अंत्योदय शिधापत्रिका धारकांना आनंदाचा शिधा वाटप केला जातो.परंतु दिवाळी येऊनही मारेगाव तालुक्यात मात्र आनंदाचा शिधा पोहोचलाच नाही.याबाबत मनसे आक्रमक झाली असुन मनसेचे मारेगाव शहराध्यक्ष चांद बहादे यांचे नेतृत्वात तहसीलदारांमार्फत जिल्हा पुरवठा निरीक्षकांना निवेदन देत ‘ताबडतोब जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करा अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन करू’ असा इशारा देण्यात आला आहे.
अवघ्या एका दिवसावर दिवाळी येऊन ठेपली असली तरी मारेगाव तालुक्यात मात्र अजून पावेतो आनंदाचा शिधा पोहोचलेला नाही.परिणामी अनेक कुटुंबीयांची दिवाळी अंधारातच साजरी होणार असून याबाबत मनसे आक्रमक झाली आहे.
दरम्यान ता.९ नोव्हेंबर रोजी मनसेचे मारेगाव शहराध्यक्ष चांद बहादे यांचे नेतृत्वात असंख्य मनसे सैनिकांनी तहसीलदारांमार्फत जिल्हा पुरवठा निरीक्षकांना निवेदन दिले.
सदर निवेदनात ‘दिवाळीच्या तीन महिने आधी शासनाने आनंदाचा शिधा घोषित केला असताना केवळ पुरवठा विभागाच्या सुस्तपणामुळे आनंदाचा शिधा तालुक्यात पोहोचलाच नाही. परिणामी गरीब,शेतकरी तसेच अंत्योदय शिधापत्रिका धारकांची दिवाळी अंधारात जाणार असून आनंदाचा शिधा त्वरित उपलब्ध करून द्या अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन करू’ असा सज्जड दम मनसेने आपल्या निवेदनातून दिला आहे.
यावेळी मनसे शहराध्यक्ष चांद बहादे,गजानन चंदनखेडे,विलास रायपूरे, ज्ञानेश्वर धोपटे,रामदास धानकी, सौरव सोयाम,हरीश झाडे,ईशांत दारुंडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
दिवाळीपूर्वीच लाभार्थ्यांना आनंदाचा शिधा मिळणार…!
आनंदाचा शिधा शहरासह तालुक्यातील सर्व लाभार्थ्यांना दिवाळीपूर्वीच मिळणार आहे.तूर्तास तालुक्यातील काही रास्त धान्य दुकानात आनंदाच्या शिधा किट पोचल्या असुन उर्वरित दुकानातही लवकरच पोचणार असून त्यानंतर किट वाटपास सुरुवात होईल.
मारेगाव तहसीलदार
यु.एस.निलावाड




