– मारेगाव तालुक्यात तोतया अधिकाऱ्यांचा शिरकाव
– पोलिसात तक्रार दाखल
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
मारेगाव तालुक्यात तोतया अधिकाऱ्यांचा शिरकाव झाला आहे.आम्ही भारतीय खाद्य निगम महामंडळाचे अधिकारी असल्याचा बनाव करुन स्वस्त धान्य वाटप दुकानदारांना ‘धान्य वाटपात हयगय करून धान्य वाटप केल्याने त्यांचेकडून या अधिकाऱ्यांनी पैसे उकळल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे.पैसे घेऊन छू मंतर झाल्यानंतर अधिकारी हे ‘तोतया’ अधिकारी असल्याची बाब उघडकीस आल्याने त्यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
आधुनिक युगात ऑनलाइन फसवणुकीच्या घटना नित्याच्याच झाल्या आहेत.परंतु मारेगावात एक आगळीवेगळी फसवणुकीची घटना घडल्याने यास बळी पडलेल्या स्वस्त धान्य दुकानदारात कमालीची दहशत पसरली आहे.
मारेगाव तालुक्यात दोन अनोळखी व्यक्तींनी (वाहन क्र. MH36 H 4254) आपण भारतीय खाद्य निगम महामंडळाचे अधिकारी असल्याचा बनाव करत रास्त धान्य दुकानदारांच्या दुकानाचे फोटो काढून धान्य वाटपात हयगय केल्याप्रकरणी म्हैसदोडका येथील रास्त धान्य दुकानदार चव्हाण यांचेकडून १ हजार रुपये,नवरगाव येथील बि.पी.दारुंडे यांचेकडून २ हजार रुपये उकळले तसेच करणवाडी येथील सौ. एस.एन.काळे यांना धान्य वाटपात हयगय केल्याप्रकरणी वीस हजार रुपयांची मागणी केली.
दरम्यान या अधिकाऱ्यांची शहानिशा केल्यानंतर रास्त धान्य दुकानदारांना कळले की ह्या व्यक्ती कुठल्याही शासकीय पदावर नसून सदर व्यक्तींना रास्त धान्य दुकानदारांवर कार्यवाही करण्याचा कुठलाही अधिकार नाही.
तुर्तास या अनपेक्षित घटनेने तालुक्यातील रास्त धान्य दुकानदार पुरते भयभीत झाले असून अशी घटना पुन्हा घडु नये याकरिता त्या दोन तोतया अधिकाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करण्यात यावे अशा आशयाची तक्रार पुरवठा विभाग,तहसील कार्यालय, मारेगाव तसेच रास्त भाव धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष मोहन गणपत व्यापारी यांचे कडून मारेगाव पोलिसात दाखल करण्यात आली आहे.




