– स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानंतरही अनेक प्रश्न अनुत्तरित
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
प्रफुल्ल मोरेश्वर ठाकरे : मारेगाव
१५ ऑगस्ट रोजी अवघ्या देशभरात स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात पार पडला.परिणामी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची सांगता झाली.एकीकडे अवघ्या देशभरात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा होत असताना यवतमाळ जिल्ह्यात तब्बल पाच शेतकऱ्यांनी स्वताला मृत्यूच्या ‘पारतंत्र्यात’ झोकल्याचे भयान वास्तव समोर आले आहे.ही गोष्ट मनाला छेदुन गेली.नकळत मनात एका प्रश्नाची काहीली माजली…आम्ही खरंच स्वतंत्र आहोत काय…?
शेती हा आपला मुख्य व्यवसाय. मग शेतकऱ्याला कोणती ‘उपाधी’ द्यावयाची ही निश्चितच विचार करावयाची बाब.काळ्या मातीत वर्षभर राबुन जगाचा पोशिंदा धान्य पिकवतो.जगाचा पोशिंदाच तो…याच जगाच्या पोशिंद्यावर धान्य व पैशाविना स्वतःच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह सुद्धा न करता यावा ही वेळ का यावी…?
१५ ऑगस्ट १९४७ चा दिवस उजाडला पक्षी पक्षी पिंजऱ्यातून उडाला.स्वातंत्र्याची रम्य प्रभात झाली.असंख्य बलिदानांचे सार्थक झाले आणि भारताला पारतंत्र्यातून मुक्तता मिळून स्वातंत्र्य मिळाले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानंतरही कवी कुसुमाग्रजांच्या या ओळी नक्कीच मनाची चलबिचल करून जातात.
शेतकरी आत्महत्या,सर्वत्र सुरू असलेल्या अल्पवयीन युवतींच्या बलात्कार व छेडीच्या किंबहुना जिवंत जाळल्याच्या घटना,मणिपूर येथील महिलांची निर्वस्त्र काढलेली धिंड,भर रस्त्यात दिवसाढवळ्या होणारे रक्तरंजित थरार, फाटके कपडे घालून भीक मागणारी लहान मुले, कोवळ्या वयात परिस्थितीने नडलेली बालकामगार म्हणून राबणारी मुले,निराधार वृद्धांची महीन्याकाठी पाचशे रुपयांसाठी कार्यालयात सुरू असलेली केविलवाणी धडपड,रस्त्या अभावी गरोदर महिलेची वाटेतच प्रसूती, या व अशा शेकडो घटना डोळ्यासमोर तरळल्या की सहजच एक प्रश्न मनाची चिरफाड करून जातो…हेच ते स्वातंत्र्य ज्याची आम्ही अपेक्षा केली होती…?
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा नंतरही जीवनावश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध होत नसेल तर अशा स्वातंत्र्याला काय अर्थ उरतो…? स्त्री-पुरुष समानतेचा ऊहापोह करणारे आम्ही ती गोष्ट फक्त भाषणापूर्ती मर्यादित राखतो.महाविद्यालयात शिकायला जाणारी मुलगी जर सुरक्षित नसेल,शाळेत शिकणारी ‘उमलती फुलं’ दिवसा ढवळ्या रस्त्यातून अपहरण केली जात असतील तर शेकडोंच्या बलिदानाचा परिपाक ठरलेले स्वातंत्र्य कोण्या कामाचे…?
नुकतंच आम्ही चंद्रावर यान पाठवलंय…२३ ऑगस्ट रोजी चंद्रमोहीम यशस्वी रित्या फत्ते करणाऱ्या जगातील ४ देशांच्या यादीत आम्हाला आता स्थान मिळणार…नक्कीच मिळणार.निर्विवादपणे प्रत्येक भारतीयासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे.आपण पारतंत्र्यातून स्वतंत्र होऊन पृथ्वीपासून ३ लाख ८४ हजार ४०० कि.मी. दूर असलेल्या चंद्रावर ‘यान’ पाठवलंय.चंद्र दृष्टीक्षेपात आहे. परंतु इथे वारंवार घडणाऱ्या, माणुसकीला काळीमा फासणाऱ्या,लज्जास्पद घटनांची पुनरावृत्ती होत असेल तर याला प्रगती म्हणावं की अधोगती…? यात चूक कुणाची…? शासन-प्रशासन तसेच सर्वसामान्य स्तरावरून या गोष्टीचा विचार होणे आता गरजेचे होऊन बसले आहे.
