– शेती करायची कशी…?
– तालुका काँग्रेस कमिटीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातून साकडे
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
कर्जाची परतफेड वेळेवर केली असता दर वर्षी नियमित कर्जदारांना ३१ मार्च नंतर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा मारेगाव यांचे वतीने कर्ज मिळत असते. परंतु यावर्षी सहकारी संस्थांच्या १४४ सभासदांना कर्ज न मिळाल्याने या सभासदांना कर्जाचे त्वरित वितरण करण्यात यावे अशा आशयाचे निवेदन तालुका काँग्रेस कमिटी यांचे वतीने २५ जुलै रोजी तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
मारेगाव तालुक्यातील एकूण सहकारी संस्थांची संख्या ही २२ आहे. यातील १४४ सभासदांनी आपल्या कर्जाची परतफेड वेळेवर केली. मागील वर्षीच्या कर्जाची परतफेड वेळेवर करूनही ३१ मार्च नंतर नवीन कर्ज वितरित करावयाचे असताना त्याबाबत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा मारेगावने असमर्थता दाखविल्याने शेतकरी पुरता डबघाईस आला आहे.
परिणामी काँग्रेस कमिटी शाखा मारेगाव यांची वतीने २५ जुलै रोजी तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
यात शेकडो अडचणी असताना सभासदांनी तडजोड करून मागील वर्षीच्या कर्जाची परतफेड केली. बँकेमार्फत पहिल्या यादीतील सभासदांना कर्ज वाटपही झाले.परंतु नियमित कर्ज भरूनही १४४ सभासद शेतकऱ्यांना कर्ज न मिळाल्याने शेती करावयाची कशी…? असा प्रश्न उपस्थित केला असुन २२ सहकारी संस्थांतील कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या १४४ सभासदांना तात्काळ कर्ज वितरित करण्यात यावे ही प्रमुख मागणी निवेदनातुन करण्यात आली आहे.
यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मारुती गौरकार, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती गौरीशंकर खुराना, अंकुश माफुर, प्रफुल्ल विखणकर, संतोष मडावी, समीर सय्यद, नयन आसुटकर,शकुंतला वैद्य, मारुती सोमलकर,सागर लोणारे यांचेसह शेकडो काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.




