– प्रशासनाचा भोंगळ कारभार अधोरेखित
– नागरिकांचा पाण्यात बसून प्रशासनावर हल्लाबोल
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
गेल्या काही दिवसापासून पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे.परिणामी शहरातील नाल्या तुंबल्या असून याची प्रचंड झळ येथील प्र.क्र.४ चे नागरिकांना बसली आहे.ता.२१ जुलै रोजी या प्रभागातील अनेक घरात पाणी शिरले असून सदर प्रभागास पुरते तलावाचे रूप आले आहे.परिणामी येथील नागरिकांनी प्रशासनावर हल्लाबोल करत चक्क पाण्यात बसून प्रशासनाचे भोंगळ कारभाराविरुद्ध रोष व्यक्त केला.
गत काही दिवसापासून शहरासह परिसरात पावसाने चांगलाच जोर धरला आहे.काल काहीशी विश्रांती घेतलेल्या पावसाने आज सकाळपासूनच शहरात जोरदार पुनरागमन केले.
दरम्यान ता.२१ जुलै रोजी सकाळी पावसामुळे शहरातील प्रभाग क्रमांक ४ येथील अनेक घरात पाणी शिरले आहे.पाणी जाण्यास मार्ग नसल्याने या प्रभागास पुरते तलावाचे रूप आले आहे.येथील रस्ताही दिसेनासा झाला आहे.
प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा निषेध करत प्रभाग क्रमांक ४ येथील रहिवाशी शिवसेना शहर प्रमुख (शिंदे गट) विजय मेश्राम, विकास गेडाम,महेश जुनगरी यांनी चक्क पाण्यात बसून ‘नगरपंचायत मुर्दाबाद मुर्दाबाद’ चा नारा देत प्रशासनाविरुद्ध प्रचंड रोष व्यक्त केला.
शहरातील प्रभाग क्रमांक ४ येथील नागरिकांनी केलेल्या ‘अघोषित आंदोलनाचे’ गांभीर्य प्रशासनाचे लक्षात येते की नाही हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.




