– मध्यरात्री एमएसईबी प्रांगणात नागरिकांचा तब्बल पाच तास ठिय्या
– लेखी आश्वासनाअंती तोडगा
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
‘आमच्या गावातील वीजपुरवठा सुरळीत सुरू होत नाही तोपर्यंत मारेगावातील वीजपुरवठा सुरू ठेवता येणार नाही’ असा आग्रह पिसगाव व पहापळ येथील नागरिकांनी धरल्याने ता.१६ जुन रोजी रात्री शहरातील वीजपुरवठा बंद करण्यात आला. ही बाब शहरात वाऱ्यासारखी पसरताच शहरातील शेकडो नागरिक ग्रामीण भागातील नागरिकांच्या मदतीस उतरत एमएसईबी कार्यालय गाठुन तब्बल पाच तास ठिय्या दिला.लेखी आश्वासनाअंती शहरासह ग्रामीण भागातील विद्युत पुरवठा मध्यरात्री २ वाजता पूर्ववत सुरू करण्यात आला.
गेल्या काही दिवसांपासून शहरासह ग्रामीण भागात सतत वीजपुरवठा खंडित होण्याचा प्रकार सुरू आहे.वेळी-अवेळी अचानक वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांचे प्रचंड हाल होत आहे.सध्या उकाडा वाढल्याने लहान मुले व वृद्धांना मोठ्या अडचणी निर्माण होत असून शेती कामे तोंडावर आली असताना यात शेतकऱ्यांना अनेक अडचणी येत आहे. महावीतरणाच नेमकं चाललंय काय…? असा खोचक सवाल जनसामान्य उपस्थित करतांना दिसुन येत आहे.
दरम्यान १६ जुन रोजी रात्री ९ वा. तालुक्यातील पिसगाव व पहापळ येथील नागरिक एमएसईबी कार्यालयावर धडकले.जोपर्यंत ‘आमच्या गावातील विद्युत पुरवठा सुरळीत सुरू होत नाही तोपर्यंत शहरातील विद्युत पुरवठा सुरू ठेवता येणार नाही’ असा आग्रह त्यांनी धरल्याने शहरातील विद्युत पुरवठा बंद करण्यात आला.

ही बाब शहरात वाऱ्याच्या वेगाने पसरली. महावितरण विरोधात शहरातील नागरिकांमध्ये असलेला रोष ग्रामीण भागातील नागरिकांच्या दिमतीस उतरल्याने शेकडोंचा जनसागर,विविध पक्षांचे लोकप्रतिनिधी एमएसईबी कार्यालयावर धडकले.वीज वितरण कर्मचारी नागरिकांना हाताळण्यात अयशस्वी ठरल्याने शेवटी पोलीस प्रशासनाला पाचारण करण्यात आले.यावेळी एमएसईबी कार्यालयाला १७ जुन चे मध्यरात्री जत्रेचे स्वरूप आले होते.
कार्यकारी अभियंत्यांच्या लेखी आश्वासनावर नंतर या अघोषित मोर्चावर तोडगा काढण्यात आला. व मध्यरात्री दोन वाजता विद्युत पुरवठा पूर्ववत सुरू करण्यात आला. यावेळी एमएसईबी आवारात उपस्थित नागरिकांनी एकच जल्लोष केल्याचे चित्र पहावयास मिळाले.




