– कार्यकर्त्यांसह मित्रपरिवारावर शोककळा
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
चंद्रपूर लोकसभा क्षेत्राचे खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांचे आज (मंगळवार) पहाटे तीन वाजताचे सुमारास दिल्ली येथील मेदांता हॉस्पिटल मध्ये उपचारादरम्यान निधन झाले.धानोरकर यांच्या अशा अवेळी एक्झिटने काँग्रेस कार्यकर्त्यांसह त्यांचे मित्रपरिवारावर शोककळा पसरली आहे.
काँग्रेसचे खासदार बाळू उर्फ सुरेश धानोरकर (४७) यांचेवर गेल्या दोन दिवसांपासून दिल्लीतील मेदांता रुग्णालयात उपचार सुरू होते.परंतु, उपचाराला प्रतिसाद न दिल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. गेल्या शनिवारी म्हणजेच २७ मे रोजी त्यांच्या वडिलांचं निधन झालं होतं. त्यावेळीच त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने नागपूरहून विशेष एअर ॲम्ब्युलन्सने उपचाराकरिता दिल्लीला दाखल करण्यात आल होत.
यावेळी सुरू असलेल्या उपचारांशी त्यांची झुंज अपयशी ठरली. २०१४ ला ते आमदार असताना त्यांचेवर स्थुलतेची शस्त्रक्रिया करण्यात आली होती.तर त्यांच्या आतड्यांमध्ये गुंतागुंत झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. शनिवारी किडनी स्टोनचे ऑपरेशन झाले. त्यानंतर आतड्यात इंफेक्शन झाल्याचे समोर आले. त्यामुळे त्यांना एअर अम्बुलन्सने दिल्लीतील मेदांता रुग्णालयात हलवण्यात आले होते.अखेर मंगळवारी पहाटे साडेतीन वाजेदरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
आज दुपारी २ ते ४ वाजेदरम्यान खा.बाळू धानोकर यांचे पार्थिवाचे दर्शन घेता येणार असुन त्यानंतर त्यांचे पार्थिवावर शासकीय इतमातात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
महाराष्ट्रातील काँग्रेसचे एकमेव खासदार असलेले व प्रचंड जनसंपर्क असलेले बाळु धानोरकर यांचे अशा अवेळी एक्झिटने काँग्रेस कार्यकर्त्यांसह त्यांचे मित्र परिवारावर पुरती शोककळा पसरली आहे.
त्यांचे पश्चात आई वच्छलाबाई ,पत्नी वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्राच्या आमदार प्रतिभाताई धानोरकर, दोन मुले मानस व पार्थ , एक भाऊ, एक बहीण असा आप्त परिवार आहे.





