– पादचारी,विद्यार्थी व वाहन चालकांना नाहक त्रास
लोकशस्त्र न्यूज नेटवर्क : मारेगाव
मारेगांव शहर भटक्या कुत्र्यांच्या विळख्यात सापडले आहे.शहरात भटक्या कुत्र्यांच्या टोळ्यांचा मुक्तसंचार सुरू असुन पादचाऱ्यांना तसेच दुचाकी चालकांना लक्ष केलं जातं आहे. भटक्या कुत्र्यांमुळे रस्त्यावर नेहमीच छोटे-मोठे अपघात होताना दिसुन येत असुन स्थानिक प्रशासनाला मात्र जाग येत नाही.
शहरात दिवसेंदिवस वाढत असलेली ‘मोकाट कुत्र्यांची संख्या’ जनसामान्यांची डोकेदुखी बनली असून रस्त्यावरील मोकाट कुत्र्यांना आवर कोण घालणार…? असा प्रश्न शहरवासीयांकडून उपस्थित केला जातो आहे.
शहरात भटक्या कुत्र्यांचा मुक्त संचार असून जागोजागी कुत्र्यांच्या टोळ्या दिसतात. कधी रस्त्यावर तर कधी शाळेजवळ ही कुत्री जमा होऊन जोरजोरात आवाज करतात. कुत्र्यांच्या मोठ्या आवाजाचा त्रास वृद्धांना होतोच शिवाय शाळेजवळ कुत्र्यांचा घोळका जमा झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊन अध्ययन अध्यापनाच्या प्रक्रियेत खंड पडतो.
शहरातून जाणाऱ्या राज्य महामार्गावर मोकाट कुत्र्यांमुळे वाहन चालवीताना वाहन चालकाला नाहक त्रास सहन करावा लागत असुन अचानक एखादा कुत्रा वाहनास आडवा येऊन अपघात होण्याचा धोका नाकारता येत नाही.
मोकाट कुत्र्यांची संख्या वाढू नये म्हणून नगरपंचायत मार्फत कुत्र्यांच्या निर्बीजी करणासाठी मोहीम राबविणे आवश्यक असते.परंतु सद्य स्थितीत प्रशासन कुठल्याही तयारीत दिसत नाही किंबहुना कोणताच लोकप्रतिनिधी या गोष्टीला हात घालताना दिसुन येत नाही.




