– ओम नगरी मधील घटना
– पोलीसात तक्रार दाखल
लोकशस्त्र न्यूज नेटवर्क : मारेगाव
शहरातील ओम नगरीतील दोन घरे फोडत चोरट्यांनी एका घरातील रोख रकमेसह सोन्याचे दागिने तर दुसऱ्या घरातील रोख रकमेवर हात साफ करुन पोबारा केल्याची घटना सोमवारी पहाटेच्या सुमारास उघडकीस आल्याने शहरात एकच खळबळ उडाली.
मारेगाव येथील ओम नगरीत राहणाऱ्या लता अनिल डाखरे (४२) या आरोग्य विभागात आशा सुपरवायझर असून त्यांचा एकविरा पतसंस्थेत डेली विजेसचा व्यवसाय आहे.डाखरे कुटुंब रविवारी रात्री जेवून झोपी गेले असता त्यांचे घराचा मुख्य दरवाजा बाहेरून लावत बाजूच्या खोलीतून चोरट्यांनी घरात प्रवेश केला.कुटुंब गाढ झोपेत असतांना चोरट्यांनी बेडरूम मध्ये चोर पावलांनी प्रवेश केला.
बेडरूमध्ये ठेवलेली पिवळ्या रंगाची पेटी चोरट्यांच्या निदर्शनास येताच चोरट्यांनी पेटीसह घटनास्थळावरून पोबारा केला.पेटीत असलेले डेली विजेसचे ३० हजार रुपये रोख व एकदानी १० हजार रुपये,सोन्याचे तार ५ हजार रुपये असा एकूण ४५ हजार रुपयांच्या ऐवजावर चोरट्यांनी डल्ला मारला.
लता अनिल डाखरे यांच्या घरातील चोरीचे मिशन फत्ते करत चोरट्यांनी आपला मोर्चा शेजारील घराकडे वळवित रामेश्वर महादेव राऊत (५०) यांचे घरातील बॅग मध्ये असलेले ५००० रुपये रोख लंपास केले.
चोरट्यांनी चोरीत वापरलेले कटर व इतर साहित्य घराबाजूला असल्याचे निदर्शनास आले आहे.या घटनेने शहरात कमालीचे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.लता अनिल डाखरे यांनी मारेगाव पोलिसात तक्रार दाखल केली असून घटनेचा पुढील तपास ठाणेदार राजेश पुरी यांच्या मार्गदर्शनात पोलीस जमादार आनंद अलचेवार व अफझलखान पठाण करित आहे.
