— आमदार बोदकुरवार यांचे हस्ते दिला धनादेश.
लोकशस्त्र न्युज नेटवर्क/ मारेगांव
तालुक्यातील शिवणी (धोबे) तथा कोलगाव येथील शेतकरी आत्महत्याग्रस्त, तथा गोरज येथील वीज पडून मृत्यूमुखी पडलेल्या कुटूंबीयांच्या वारसांना शासकीय मदत म्हणून आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार तथा तहसीलदार उत्तम निलावाड यांचे हस्ते तर भाजपा तालुकाध्यक्ष अविनाश लांबट, ता.सरचिटणीस प्रशांत नांदे, शहराध्यक्ष अनुप महाकुलकर व गोरज येथील पोलीस पाटील प्रमोद ताजणे, नवसू सूडित यांच्या उपस्थितीत तहसील कार्यालयात धनादेश प्रदान करण्यात आले.

दरम्यान शिवणी (धोबे) येथील ३३ वर्षीय शेतकरी इश्वर मारोती ढोके यांनी १७ /१२ /२०२३ रोजी विष प्राशन करून आत्महत्या केली होती तर कोलगाव येथील शालीक उर्फ प्रदीप नाना अवताडे यांनी सुध्दा ता.२२/१२/२०२३ रोजी विष प्राशन करून आत्महत्या केली होती. या दोन्ही आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांच्या वारसांना शासकीय मदत म्हणून प्रत्येकी १ लाख रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला.

ता.३० ऑगस्ट २०२४ रोजी शेतात काम करुन घरी परत येतांना, दुपारी ३.३० वाजेदरम्यान वाटेतच वीज अंगावर कोसळून गोरज येथील ३५ वर्षीय निर्मला श्रीकृष्ण आत्राम यांचा जागीच मृत्यू झाला होता. पती व मृतक दोघेही मोलमजुरी व भाड्याने शेती करुन संसाराच गाडा हाकत होते. या कुटुंबाला सुध्दा शासकीय मदत म्हणून आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार याचे हस्ते ४ लाख रुपयाचा धनादेश, तहसील कार्यालयात ता. २१ सप्टेंबर रोजी ११ वाजता प्रदान करण्यात आला.




