– बस थांबण्यास अडचण
– भा.क.प.चे श्रीकांत तांबेकर यांचे पो. स्टे. निवेदन सादर
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
शहरातील बे-लगाम ऑटो पार्किंग जनसामान्यांची डोकेदुखी बनली असून जागा मिळेल तिथे ऑटो पार्क केले जात असल्याने बस थांबण्यास अडचण येत असून नेमकी बस थांब्याची जागा कोणती हे समजणे प्रवाशांना कठीण होऊन बसले आहे.परिणामी बे-लगाम ऑटो पार्किंग विरोधात भा.क.प.चे श्रीकांत तांबेकर यांनी १० जुलै रोजी मारेगाव पो. स्टे. ला निवेदन देत सदर प्रश्न त्वरित निकाली लावण्याची मागणी केली.
शहराच्या मध्यातून जाणाऱ्या वणी-यवतमाळ राज्य महामार्गावर आंबेडकर चौक,मार्डी रोड तसेच मेवाड उपहारगृह येथे नेहमीच वाहतूक कोंडी उद्भवते.जागा मिळेल तिथे ऑटो पार्क केले जात असल्याने बस थांबायची जागाही निश्चित नाही.परिणामी बस साठी शालेय विद्यार्थ्यांसह प्रवाशांना एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी धावपळ करावी लागत असल्याने नाहक मनस्ताप सहन करावा लागतो आहे.
दरम्यान १० जुलै रोजी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे श्रीकांत तांबेकर यांनी शहरातील या बे-लगाम ऑटो पार्किंगचा प्रश्न त्वरित निकाली लावुन एक वाहतूक पोलीस येथे नियुक्त करावा अशा आशयाचे निवेदन मारेगाव पोलीस स्टेशनला सादर केले.
यावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे श्रीकांत तांबेकर यांचेसह शेख खलील,धनराज अडबाले,विठ्ठल रामपुरे आदी उपस्थित होते.




