— ग्रामीण १५१, शहरी १७ दुर्गादेवी तर ५ शारदा देवी
— सर्वत्र आनंदाला उधाण
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
महाराष्ट्रा सह अवघ्या देशभरात उत्साहात साजरा होणाऱ्या नवरात्रोत्सवाला ता. ३ ऑक्टोंबर पासून प्रारंभ होत असून सर्वत्र ‘उदो बोला उदो’ च्या गजरात आदिशक्ती विराजमान होत आहे. मारेगाव शहरातही वाजत गाजत, आकर्षक रोशनाईसह, नयनरम्य देखावे उभे करुन मातेच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार असून यावर्षी तालुक्यातील ग्रामीण भागात १५१ व शहरी भागात १७ एकुण १६८ ठीकाणी दुर्गादेवीची तर ग्रामीण भागात ५ ठीकाणी शारदा देवीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार असल्याची माहीती असून भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
शारदीय नवरात्र हा देवी दुर्गा मातेच्या सन्मानार्थ दरवर्षी अगदी आनंदात साजरा केला जाणारा हिंदू सण आहे. नवरात्र म्हणजे नऊ रात्रींचा समूह असा शब्दशः अर्थ होत असून हा सण नऊ रात्री (आणि दहा दिवस) साजरा होतो. यात आकर्षक मंडप देखावे उभे करून दुर्गा मातेच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाते. दसऱ्याच्या दिवशी दुर्गोत्सवाची सांगता केली जाते.
दरम्यान याही वर्षी तालुक्यात मारेगाव शहरासह ग्रामीण भागात मोठ्या आनंदात ता. ३ ऑक्टोंबर रोजी दुर्गोत्सवाला प्रारंभ होत आहे. यावेळी तालुक्यातील ग्रामीण भागात १५१ तर शहरी भागात १७ नोंदणीकृत मंडळ, आकर्षक मंडपाच्या देखाव्यात, वाजत गाजत “उदो ग अंबे उदो” च्या निनादात मातेच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार असून भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
मारेगाव शहरात विविध दुर्गोत्सव मंडळांनी आपापल्या परीने मनमोहक रोषणाईने नटलेले नयनरम्य देखावे उभे केले असून लहान थोरांसह सर्वांनाच आकर्षित करीत आहे.
नवरात्र उत्सवाच्या सर्व भक्त गणांना लोकशस्त्र न्यूज नेटवर्क कडून मनःपूर्वक शुभेच्छा.




