– मारेगाव तालुक्यातील घटना
– जनहित मदतीस धावली
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
गुरुवार मारेगाव तालुक्यासाठी ‘अपघात वार’ ठरला.वणी यवतमाळ राज्य महामार्गावरील गौराळा फाट्या नजिक रात्री ७:१५ वाजे दरम्यान दोन दुचाकी खड्ड्यात शिरल्याने झालेल्या वेगवेगळ्या दोन अपघातात दोन्ही दुचाकी वरील महिला जखमी झाल्या.यातील एका महिलेची प्रकृती गंभीर असल्याने महिलेस चंद्रपूर येथे हलविण्यात आले.यावेळी गंभीर जखमींच्या मदतीस जनहित कल्याण संघटना धावुन आली.
सुनीता नागेश खंडाळे (३०) रा. वरोरा असे पहिल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे.त्या आपल्या पती नागेश खंडाळे यांचेसह वेगाव येथे त्यांच्या माहेरी येत असल्याची माहिती आहे.
दरम्यान वणी यवतमाळ राज्य महामार्गावरील गौराळा फाट्या नजीक त्यांची भरधाव दुचाकी खड्ड्यात शिरल्याने त्या आपल्या पतीसह रस्त्यावर कोसळल्या.यावेळी त्यांच्या डोक्याला जबर मार लागला. जनहित कल्याण संघटनेच्या रुग्णवाहिकेने सुनिता यांना प्राथमिक उपचाराकरिता मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असता प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारार्थ चंद्रपूर येथे हलविण्यात आले.
दुसऱ्या एका अपघातात लता विलास देऊळकर (५०) रा.गोंड बुरांडा या आपल्या पती विलास देऊळकर यांचेसह वरोरा येथील रुग्णालयातून गोंड बुरांडा येथे स्वगृही परत येत असता वणी-यवतमाळ राज्य महामार्गावरील गौराळा नजीक असलेल्या डिव्हायडर जवळील खड्ड्यात त्यांची दुचाकी शिरल्याने पती-पत्नी रस्त्यावर कोसळले. यावेळी लता यांच्या डोक्याला मार लागून त्या जखमी झाल्या.
जखमी लता यांस जनहित कल्याण संघटनेच्या रुग्णवाहिकेने मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दोन्ही जखमींना जनहितचा मदतीचा हात…!
गुरुवारी रात्री झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात दोन्ही जखमी महिलांना जनहित कल्याण संघटनेच्या रुग्णवाहिकेने मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.यातील गंभीर जखमी असलेल्या सुनिता यांना जनहित कल्याण संघटनेच्या रुग्णवाहिकेने पुढील उपचारार्थ चंद्रपूर येथे हलविण्यात आले.यावेळी जनहित कल्याण संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गौरीशंकर खुराणा, जनहितचे पदाधिकारी व कार्यकर्ते हजर होते.जखमींच्या मदतीस सुरू असलेली ‘जनहितची’ धडपड यावेळी दिसून आली.




