– बीएसएनएलचा जानीवपुर्वक कानाडोळा
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : प्रफुल्ल ठाकरे
आधुनिक युगात मोबाईलचे तंत्रज्ञान विकसित होऊन जनसामान्यांच्या हातात मोबाईल आला आणि टेलिफोन वापरणाऱ्याची संख्या अगदी नगन्य झाली.बहुतांश गावांत ही सुविधा हद्दपार झाली आहे.त्यामुळे बीएसएनएलचे खांब व इतर साहित्य बेवारस झाले.अनेकांनी तार व खांबावर आपले हात साफ केले उर्वरित काही खांब अखेरची घटका मोजत असल्याचे चित्र तालुक्यात सर्वत्र दिसून येत आहे.
कधीकाळी घरातून ऐकायला येणारी टेलीफोनची घंटा त्या घरातील श्रीमंतीची साक्ष देत होती.फोनची घंटा ही त्या घरातील वैभवाच लक्षण समजली जायची.फोन विकासाचे साधन बनले होते.
फोनची वाढती मागणी लक्षात घेऊन बीएसएनएलने गावोगावी ही यंत्रणा पोचविण्यासाठी खांब उभे केले होते.या खांबावर तारा टाकून संदेश पोचविण्याचे काम केले जात होते.
जलद संदेश पोचविला जात असल्याने ही सेवा अल्पावधीतच लोकप्रिय झाली.पण बरेचदा तारा तुटून ही सेवा खंडित होण्याचे प्रकार वारंवार घडत असे.त्यानंतर यात सुधारणा करून जमिनीतून केबल टाकल्या गेले.यामुळे ही यंत्रणा आणखी गतिमान झाली होती.
तुर्तास ब्रिटीश काळा पासून सेवा देणारे खांब आणि तारा कुचकामी बनून निराधार झाल्या असल्याचे वास्तव तालुक्यात दिसून येत आहे.
सदर यंत्रणेकडे कोणीच लक्ष देत नसल्याने ही यंत्रणा बेवारस स्थितीत असुन अनेक संधीसाधू व चोरट्यांनी ही गोष्ट बरोबर हेरली.काही दिवस रात्रीच्या अंधारात हात साफ करणारे चोरटे कालांतराने दिवसा ढवळ्या बिनधास्तपणे आपल्या फायद्यासाठी या वस्तू घेऊन जाऊ लागले.
शहरासह तालुक्यातील अनेक गावांत आजही हे खांब उभे असून जुन्या वैभवाची आठवण करून देत आहे.एकेकाळी कुतूहलाचा विषय बनलेली ही शासकीय संपत्ती बेवारस स्थितीत पडून आहे.तर अनेक खांब आजही कुणाच्या मीटरचा,शेडचा,जनावरांच्या गोठ्याचा आधार बनून “आधार” देत उभे आहेत.





