– मारेगावात बस स्थानक निर्मितीच्या हालचालींना वेग
– नियोजित जागी बस थांबवा : आगार प्रमुख
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
शहरात गेल्या तीन दशकापासून प्रलंबित असलेला बस स्थानकाचा प्रश्न अखेर सुटण्याच्या मार्गावर असून शहरात बस स्थानक निर्मितीच्या हालचालींना वेग आला आहे. ‘बस स्थानकाकरिता नियोजित जागी बस थांबवा असे’ पत्र वणी आगार प्रमुखांनी निर्गमित केले असून येत्या ‘प्रजासत्ताक दिनापर्यंत बस स्थानकाचे भूमिपूजन पूर्णत्वास नेऊ’ अशी ग्वाही आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांनी ‘लोकशस्त्र’शी बोलताना दिली आहे.
शहरात बस स्थानका अभावी प्रवाशांची प्रचंड हेळसांड होत आहे.शहरात गत तीन दशकांपासून बस स्थानक नसल्याने याबाबत अनेकदा आंदोलने करण्यात आली. ऊन पावसाच्या सरी झेलत प्रवाशांसह शालेय विद्यार्थ्यांना भर रस्त्यात उभे राहावे लागत असल्याने याबाबत जनसामान्यातून प्रचंड रोष व्यक्त होत होता.
दरम्यानच्या काळात ‘बी अँड सी’ क्वार्टर येथील जागा बस स्थानकासाठी नियोजित करण्यात आली.परंतु हालचाली शून्य असल्याने या प्रश्नावर गंज लागल्याचे वास्तव गत काही दिवसापासून दिसत होते.
सोमवारी ७ ऑगस्ट रोजी वणी- मारेगाव-यवतमाळ महामार्गावर कामगिरी करीत असताना संबंधित वाहन चालकांनी रा.प. बस मारेगाव येथील बस स्थानकाच्या नियोजित जागेवर नेऊन तिथे प्रवाशांची चढ-उतार करावी या बाबतचा आदेश रा.प. आगार प्रमुखांनी निर्गमित केला होता.
तूर्तास बस स्थानकाच्या नियोजित जागी बस नेऊन तिथे प्रवाशांची चढ-उतार करण्यात येत असल्याने लवकरच ‘स्वप्नपूर्ती’ होणार असून बसस्थानकाचा प्रश्न निकाली लागण्याची चिन्हे दिसत आहे.
बस स्थानकाच्या निर्मितीसाठी दोन कोटींचा प्रस्ताव पाठविला आहे.तो लवकरच निकाली निघणार.तूर्तास बस स्थानकाच्या नियोजित जागी तात्पुरते शेड उभारून तिथे महिलांच्या स्वच्छतागृहासह काही आणखी सोयी उपलब्ध करून देणार आहो. येत्या प्रजासत्ताक दिनापर्यंत बस स्थानकाचे भूमिपूजन पूर्णत्वास नेण्याचा माझा मानस आहे.त्या अनुषंगाने माझे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहे.
संजीव रेड्डी बोदकुरवार
आमदार,वणी विधानसभा क्षेत्र.




