– २५-३० प्रवाशी जखमी
– कटरच्या सहाय्याने जखमी महिलेस बाहेर काढण्यात यश
– राज्य महामार्गावरील गौराळा येथील घटना
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
वणी-यवतमाळ राज्य महामार्गावरील गौराळा फाट्या नजिक एका भरधाव ट्रॅव्हल्सने उभ्या टिप्परला जबर धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात २५ ते ३० प्रवासी जखमी झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी ९:३० वाजे दरम्यान घडली.जखमींना मारेगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करून ८ रूग्णांना पुढील उपचारार्थ इतरत्र हलविण्यात आले.तर एका महिलेस कटरच्या सहाय्याने ट्रॅव्हल्स मधून रात्री उशिरा बाहेर काढण्यात यश आले.
अकोला येथील हमसफर ट्रॅव्हल्स (क्र.एम.एच.२७ ए.९९९४) आकोली, तेल्हारा येथील ५० भाविकांना घेऊन चंद्रपूर जिल्ह्यातील ताडगोहा येथे दर्शनासाठी जात असल्याची प्राथमिक माहिती असुन यात वेगवेगळ्या वयोगटातील लहान थोरांचा समावेश होता.
दरम्यान ता.२८ सप्टेंबर रोजी रात्री ९:३० वाजेदरम्यान वणी-यवतमाळ राज्य महामार्गावरील गौराळा फाट्या नजीक उभ्या टिप्परला (क्र.एम.एच.३३ डब्लू.९९०९) भरधाव ट्रॅव्हल्सने मागुन जबर धडक दिली.यात ट्रॅव्हल्स मधील २५ ते ३० प्रवासी जखमी झाले.

घटनेची माहिती मिळताच मारेगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.मारेगाव शहरातील काही युवकांच्या मदतीने जखमींना मारेगाव रुग्णालयात दाखल करण्यात आले तर काही जखमींना घटनास्थळावरूनच वणी रुग्णालयात दाखल करण्यात आले.यावेळी वणी येथुन काही रुग्ण वाहीका मागविण्यात आल्या होत्या.

तुर्तास गंभीर ७ जखमींना पुढील उपचार्राथ यवतमाळ येथे तर एका महिलेस चंद्रपूर येथे हलविण्यात आले आहे.तर ट्रॅव्हल्समध्ये अडकुन बसलेल्या एका महिलेस रात्री उशिरा कटरच्या सहाय्याने बाहेर काढण्यात यश आले.उर्वरित रुग्णांना मारेगाव ग्रामीण रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

सुदैवाने या भीषण अपघातात जिवीतहानी झाली नसली तरी भाविकांची ट्रॅव्हल्स अपघातग्रस्त झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.




