♦निरोप समारंभात आले अनेकांना गहीवरून
♦लोकशस्त्र न्यूज नेटवर्क : मारेगाव
“जी.प.शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत असतांना नियत वयोमानानुसार निवृत्त झालो.कर्तव्यात असतांना अधिकारी असो की कर्मचारी यांनी स्वभावात दूराग्रह बाळगू नये.कामे करावयास येणाऱ्या अनेकांना आपले काम तात्काळ व निस्पृह व्हावे अशा माफक अपेक्षा असतात.तो तळागाळातील किंवा सर्वसामान्य असो त्यांचे पारदर्शक कामे केल्यास मानसिक हर्ष हा मापदंडात मोजता येत नाही.ही आयुष्यभराची शिदोरी कायम ठेवण्यासाठी कर्मचाऱ्यांनी समाजसेवेचे पाईक व्हावे” असे उदगार सत्कार समारंभाला उत्तर देतांना सेवानिवृत्त शिक्षक पुरुषोत्तम गमे यांनी काढले.

मारेगाव तालुक्यातील महागाव येथील शिक्षक पुरुषोत्तम गमे हे २८ फेब्रुवारी रोजी सेवानिवृत झाले.त्याबद्दल त्यांचा ग्रामपंचायत आणि शाळा व्यवस्थापन समिती यांच्या सयुक्त विद्यमाने आयोजित शाल व श्रीफळ देवून भावपुर्ण गौरव करण्यात आला.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मारेगाव पं.स.चे गटविकास अधिकारी किशोर गज्जलवार,प्रमुख अतिथी म्हणून गटशिक्षणाधिकारी नरेंद्र कांडुरवार,सरपंच निलिमा थेरे,उपसरपंच अविनाश लांबट,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गजानन लांबट,मा.पो.पा. देविदास लांबट,पवन मिलमीले,गणेश खुसपुरे,मुरलीधर बल्की,ज्योतीताई वाकडकर,विमल दूधकोहळे,संगीता वाघाडे,विमल आत्राम,पंढरी लांबट उपस्थित होते.

१९८८ ला यवतमाळ जिल्ह्यातील एका आश्रम शाळेमध्ये शिक्षक म्हणून नोकरीला सुरुवात केली.१९९२ रोजी जी. प.मध्ये नेमणूक झाली आणि प्रथम नेमणूक ही एका पारधी बेड्यावर झाली. आणि खऱ्या अर्थाने सेवेला सुरुवात झाली.विद्यार्थी प्रिय आणि शिस्तप्रिय असलेले आणि आपले सर्वस्व शिक्षणासाठी झोकून देणाऱ्या गमे सर ह्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. यावेळी अनेकांनी आपले मनोगत व्यक्त करीत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.

मारेगाव तालुक्यातच जन्मलेले आणि तालुक्यातच खऱ्या अर्थाने मनापासून सेवा देणारे पुरुषोत्तम गमे यांचे सेवेतील ३१ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.सर्वांना समान अधिकार,प्रशासकीय कामातील समतरता,मृदू भाषिक आणी तळागाळातील सर्वसामान्य कुटुंबातील बालकांना जिवनोपयोगी शिक्षण मिळावे ही त्यांची तळमळ.त्यांचे कार्य,कामे करण्याच्या शैलीने जनसामान्यात वेगळाच ठसा उमटवित सर्वांना आपलेसे करवून घेतले.प्रशासकीय सेवेतील तब्बल ३२ वर्ष सेवेनंतर २८ फेब्रुवारी २०२३ रोजी निवृत्त झाले.

या भावनाविवश प्रसंगात बोलतांना त्यांनी आयुष्यातील काळजाचे ठोके चुकविणारे प्रसंग शब्दरूपी कथन करित कर्तव्यात असतांनाही लोकाभिमूख व्यक्तीमत्वाने मी सर्वांच्या मनात रुजलो हीच माझ्यासाठी खरी पावती असल्याने स्वभावात दूराग्रह येवू दिला नसल्याने आजचा सत्कार सोहळा मला कर्तव्यातच असल्याची जाणीव करवून देत आहे.आजतागायत वेगवेगळ्या अनुभवाने भावनाविवश झालेल्या पुरुषोत्तम गमे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार मुख्याध्यापक टिळक खोब्रागडे यांनी तर प्रास्ताविक पवन मिलमीले यांनी केले.कार्यक्रमाला विद्यार्थी व नागरिक मोठया प्रमाणात उपस्थित होते.






