♦वाहतूक विभागाचा जानीवपुर्वक कानाडोळा
♦लोकशस्त्र न्यूज नेटवर्क : मारेगाव
प्रफुल्ल ठाकरे : मारेगांव
शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात अवैध प्रवासी वाहतुकीने कहर केला असून वाहतूक पोलिसांचे अस्तित्व तालुक्यात कुठेही दिसून येत नाही.प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरू असून वाहतूक विभाग या गोष्टीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष का करतो…? हे न उलगडणारे कोडे आहे.
तालुक्यात अवैध प्रवासी वाहतूक जोमात सुरू आहे.रिक्षात किंवा टॅक्सीत प्रमाणापेक्षा कितीतरी जास्त तर काही वेळा चक्क टॅक्सीला मागे लटकून तर कधी टॅक्सीच्या टपावर बसून अवैध प्रवासी वाहतूक सुरू आहे.अनावधानाने एखाद्या वाहनास अपघात झाला तर काय होईल..? हे कळायला मार्ग नाही.
राज्य परिवहन मंडळाकडून होत असलेल्या वाहतूक सेवेत योग्य नियोजन नसल्याने त्याचा फायदा खाजगी प्रवासी वाहतूकदारांना होत आहे.शिवाय खाजगी प्रवासी वाहतूकदार हे लहान मुलांचे भाडे घेत नाही.प्रवासी सांगतील त्या ठिकाणी वाहन उभे करतात.या फायद्याच्या गोष्टींमुळे प्रवाशांकडून बस ऐवजी टॅक्सी अथवा रिक्षा अशा खाजगी प्रवासी वाहतुकीच्या साधनांना प्राधान्य दिले जाते.खाजगी प्रवासी वाहतुकीच्या काही जमेच्या बाजू असल्या तरी ती तितकीच धोकादायक सुद्धा आहे.
“खाजगी वाहतूकदारांना दिवसातून अधिकाधिक फेऱ्या मारून पैशाची कमाई करावयाची असल्याने प्रवाशांच्या सुरक्षे ऐवजी वेगाला प्राधान्य दिले जाते.त्यामुळे अपघात होण्याची शक्यता ही अधिक असते.”
सद्यस्थितीत तालुक्यात अवैध प्रवासी वाहतुकीने कळस गाठला असून वाहनांमध्ये प्रवासी कोंबून भरलेले असतात.टॅक्सी किंवा रिक्षात हीच संख्या १५ ते २० च्या वर असते.शहरातील आठवडी बाजाराच्या दिवशी तर खाजगी वाहतूकदारांची “चांदीच चांदी” असते. वाहनाच्या मागे-पुढे तर टपावर प्रवासी अधिक कोंबून भरलेले असतात.
सगळ्या गोष्टी घडत असताना मात्र वाहतुक विभाग जाणीवपूर्वक कानाडोळा करत असल्याचे चित्र सध्या शहरासह तालुक्यात सर्वत्र दिसत असून खाजगी प्रवासी वाहतूकदार व वाहतूक विभागात असलेल्या “अर्थपूर्ण” संबंधामुळे जनसामान्यांच्या जीवाशी मात्र खेळ सुरू असल्याचे वास्तव आहे.
