– घोडदरा साज्यातील शेतकरी एकवटले
– तहसीलदारांना विनंती अर्जातुन साकडे
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
तालुक्यातील घोडदरा येथील तलाठी जयवंत कनाके यांची तडकाफडकी बदली केल्याने येथील नागरिकात प्रचंड संतापाची लाट उसळली आहे.परिणामी घोडदरा येथील शेतकऱ्यांनी एकत्र येत कनाके यांना घोडदरा साज्यात पूर्व नियुक्त करण्यात यावे अशा आशयाच्या विनंती अर्जातुन तहसीलदारांना साकडे घातले.
सद्यस्थितीत तालुक्यातील शासकीय कर्मचाऱ्यांच्या कामाचा आलेख पाहता एखाद्या कर्मचाऱ्याच्या पूर्व नियुक्ती करिता गावातील नागरिकांनी अथवा शेतकऱ्यांनी विनंती अर्ज देत एकत्र येणे तसे दुरापास्तच.परंतु मारेगाव तालुक्यातील घोडदरा गाव याला अपवाद ठरले आहे.
घोडदरा येथील तलाठी जयवंत संबा कनाके हे घोडदरा साज्यात कार्यरत असताना त्यांची तडका फडकी बदली बुरांडा साज्यात करण्यात आली.यास घोडदरा येथील शेतकरी नागरिकांनी प्रचंड विरोध दर्शवत मनमिळावू तलाठी जयवंत कनाके यांची बुरांडा येथील नियुक्ती रद्द करून त्यांना घोडदरा साज्यात पूर्व नियुक्त करण्यात यावे,अशा आशयाचा विनंती अर्ज १९ जुलै रोजी तहसीलदारांना दिला.
या विनंती अर्जावरती वसंता मिलमिले,गणेश जीवतोडे, भास्कर पाचभाई ,सोमेश्वर पायघन, अनिल रोगे,रवींद्र बोडाले, बापूजी चांदेकर, नरेश नेहारे, सूर्यभान रोगे, रामदास नेहारे यांचेसह घोडदरा येथील शेकडो शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.





