– मारेगाव पो.स्टे हद्दीतील अनंतपुर येथील घटना
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
मारेगाव पोलीस स्टेशन हद्दीतील अनंतपुर येथील एका ३४ वर्षीय विवाहित शेतकऱ्याने विषाचा घोट घेत आपली जीवन यात्रा संपविल्याची दुःखद घटना १ ऑगस्ट रोजी रात्री घडली.विवाहित शेतकऱ्याने ऐन उमेदीच्या भरात घेतलेल्या अशा टोकाच्या निर्णयाने अनंतपुर परिसरात पुरती शोककळा पसरली आहे.
मनोज पाचभाई (३४) रा.अनंतपुर असे विषाचा घोट घेत आत्महत्या केलेल्या विवाहित शेतकऱ्याचे नाव आहे.मनोज हे शेती करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते.
दरम्यान १ ऑगस्ट रोजी रात्री ९ वाजेदरम्यान त्यांनी अनंतपुर स्थित आपल्या राहत्या घरी विषाचा घोट घेतला.ही बाब कुटुंबियांच्या लक्षात येताच कुटुंबीयांनी क्षणाचाही विलंब न करता मनोज यांना वणी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान रात्री १२ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.
वृत्त लिहेपर्यंत मनोज यांच्या आत्महत्येचे कारण कळू शकले नाही.त्यांचे पश्चात पत्नी, एक मुलगी,एक भाऊ असा आप्तपरिवार असल्याची माहिती आहे.
