–– एक जागीच ठार, दुसऱ्याचा सुध्दा उशिरा मृत्यू
लोकशस्त्र न्युज नेटवर्क/मारेगाव
राज्य महामार्गावरील शिवणाळा फाट्यानजीक ता.२३ ऑक्टोंबर बुधवारला रात्री ७.३० वाजेदरम्यान मालवाहु पीकअप चारचाकी वाहणाची दुचाकीला जबर धडक बसून एक दुचाकीस्वार जागीच ठार झाले तर एकाचा चंद्रपूर येथे उपचाराठी घेऊन जातांना रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
या भिषण अपघातात जागेवरच ठार झालेल्या एका दुचाकीस्वाराचे रवींद्र रामकृष्ण अवताडे (३७) रा. खडकी तर चंद्रपूर रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झालेले अतुल झिंगू किनाके (२३) ही नावे आहेत.
मृतक रवींद्र अवताडे यांची बुरांडा शिवारात राज्य महामार्गा नजीक शिवणाळा रस्त्यावर ५ एकर शेती असुन मृतक अवताडे व सहकारी किनाके हे ता. २३ ऑक्टोबर रोजी रात्री कपाशीला पाणी (ओलीत) देण्यासाठी एम एच २९ डब्ल्यू २७७९ क्रमांकाच्या दुचाकीने जात असल्याची माहीती आहे.
दरम्यान करंजी कडून मारेगावकडे भरधाव जात असलेल्या अशोक लेलँड (पिकअप) एमएच -२९ टी ६६५१ क्रमांकाच्या चारचाकी वाहणाची दुचाकीला जोरदार धडक बसुन दुचाकीस्वार रवींद्र रामकृष्ण अवताडे हे जागीच ठार झाले तर सहकारी अतुल झिंगू किनाके यांना गंभीर जखमी अवस्थेत मारेगांव रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र गंभीर जखमी असल्याने प्रथमोपचार करून अतुल यांना तत्काळ चंद्रपूर येथे हलविण्यात आले. परंतू रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच अतूल यांचाही मृत्यू झाला.
दरम्यान मारेगाव पोलीस स्टेशनला वाहन चालका विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय सोळंके यांच्या मार्गदर्शनात पोहवा दिगांबर किनाके करीत आहे.




