— तहसील कार्यालयावर ता. ९ जुलैला भव्य मशाल मोर्चाचे आयोजन
लोकशस्त्र न्युज नेटवर्क/मारेगाव
मागील अनेक वर्षांपासून शेतकरी शेतमजुर, तथा सर्वसामान्य जनता अनेक वर्षांपासून अस्मानी व सुलतानी संकटाचा सामना करीत आहेत. सरकारकडून केवळ आश्वासनाची खैरात वाटली जात आहे. कायमच उपेक्षित असलेल्या जनताजनार्दनास, शेतकरी शेतमजुरास न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेना (उबाठा) आक्रमक झाली असून ता.९ जुलै रोज मंगळवारला, जिल्हा पक्ष प्रमुख विश्वास नांदेकर यांच्या नेतृत्वात विविध मागण्या घेऊन तहसिल कार्यालयावर भव्य मशाल मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मशाल मोर्चात हजारोच्या संख्येत सहभागी होण्याचे आवाहन शिवसेना (उबाठा) तालुकाप्रमुख संजय आवारी, तथा नगरपंचायत नगराध्यक्ष डाॅ. मनीष मस्की यांनी केले आहे.
मारेगाव तालुका विविध समस्यांनी ग्रासला असुन मागील वर्षी तालुक्यात अतिवृष्टीने वर्धा नदीच्या महापुरात अनेक शेतकरी देशोधडीला लागले. तालुक्यात एकही कारखाना नसल्याने शेत मजुरीशिवाय पर्याय नाही. त्यामुळे सुशिक्षित बेरोजगारांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. अस्मानी तथा सुलतानी संकटाने मागील पाच सहा वर्षापासुन उत्पादनात सातत्याने घट येऊन शेतकरी कर्जाच्या विळख्यात सापडला आहे. त्यामुळे नैराश्यातून शेतकरी आत्महत्येचा आकडा फुगत आहे. याकडे मात्र शासन स्तरावरून ठोस उपाययोजना होताना दिसत नसुन आश्वासनाची खैरात दिल्या जात असल्याने दुबार पेरणीसाठी बियाणे आणि खतांची आर्थिक मदत तातडीने जाहिर करावी,मागील वर्षीचा पिक विमा सरसकट देण्यात यावा, गेल्या वर्षी वर्धा नदीच्या महापुरामुळे बाधित झालेल्या ११ गावांना वेगळी मदत देण्यात यावी, सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात यावी, शेतकऱ्यांना २४ तास विद्युत पुरवठा करण्यात यावा. जर विद्युत पुरवठा केला नाही तर संपुर्ण कोल माईन्स बंद करण्यात येईल, घरगुती गॅसचे दर कमी करण्यात यावे, घरगुती विजेचे प्रति युनिट दर कमी करण्यात यावेत, वन्यप्राण्यांचा हौदोस थांबवून शेतपिकांचे संरक्षण करण्यात यावे,प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेतील शहरी व ग्रामीण लाभार्थ्यांना ३ लाख रु. अनुदान करण्यात यावे, निराधार अनुदानात वाढ करुन ते नियमित देण्यात यावेत,पावसाळा सुरु झाल्यामुळे सरकारी रुग्णालयात पुरेसा औषध साठा, रेबिज, स्नेक बाईट लस उपलब्ध कराव्या, तसेच लॅब टेक्निशियन, डेंटिस्ट (दंत रोग तज्ञ) व एक्स रे मशिन त्वरीत उपलब्ध करण्यात यावी,घरकुल लाभार्थ्यांना रेती उपलब्ध करुन देण्यात यावी, मारेगांव येथील बस स्थानकाचे काम तातडीने सुरु करण्यात यावेत, क्रिडा संकुल उपलब्ध करण्यात यावे,वणी, मारेगाव, झरी तालुक्यातील यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेतील पात्र शेतकरी लाभार्थ्यांना त्वरीत पिक कर्ज देण्यात यावे, या विविध मागण्यासाठी, शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख विश्वास नांदेकर यांच्या नेतृत्वात ता. ९ जुलै रोजी दुपारी १२ वाजता भव्य मशाल मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चात हजारोच्या संख्येत उपस्थित राहण्याचे आवाहन तालूका प्रमुख संजय आवारी तथा नगराध्यक्ष डाॅ. मनीष मस्की यांनी केले आहे.




